मुंबई Sadabhau Khot On Sanjay Raut :राज्य सरकारनं गोमातेला 'राज्य माते'चा दर्जा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राज्यभर त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. अनेक संघटनांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं, तर काहींनी याला कडाडून विरोध करत टीका केली. शिवसेना (उध्दव ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या निर्णयावर टीका करताना महायुतीतील नेत्यांना बैलाची उपमा दिली. त्यांच्या या टीकेला रयत क्रांती संघटनेचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी प्रत्युत्तर दिलं.
संजय राऊत यांनी माफी मागावी :"गाईच्या शरीरात 33 कोटी देवांचा वास असतो, म्हणून आपण गाईला गोमाता म्हणतो. त्यामुळं राज्य सरकारनं गोमातेला 'राज्य माते'चा दर्जा देण्याचा निर्णय घेतलाय, त्यात काहीही वावगं नाही. आपण गाईची पूजा करतो. गाईच्या दुधापासून, शेणापासून अनेक वस्तू आणि पदार्थ आपण तयार करतो. बैलाची देखील आपण पूजा करतो. शेतीचा शोध लागल्यानंतर पहिलं अवजार बैलाच्या खांद्यावरून आपण शेतात पाठवलं. शेतातील धान्य पिकवण्यात बैलाचं योगदान मोठं आहे. त्यामुळं बैलाला पित्याचा दर्जा देण्यात यावा, असं असताना संजय राऊत यांनी महायुतीतील नेत्यांना बैलांची उपमा देऊन बैलांचा अपमान केलाय, त्यामुळं संजय राऊत यांनी ताबडतोब माफी मागितली पाहिजे, अशी मागणी आमदार सदाभाऊ खोत यांनी केली.
राऊतांचा हात भ्रष्टाचाराच्या गटार गंगेत : "संजय राऊतांनी कधी गाय, म्हैस, बैल पाहिला नाही. त्यामुळं त्यांना गाय काय आहे हे कसं समजणार. ज्यांचा हात भ्रष्टाचाराच्या गटार गंगेमध्ये आहे, त्यांचा हात शेणात कधी जाणार नाही," असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी राऊतांवर निशाणा साधला.