पालघर : पालघर जिल्ह्यात बोईसरमध्ये खतविक्रेते मुदत संपलेली खते, औषधे, कीटकनाशके विकत असल्याचं निदर्शनास आलं. यामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आताही बोईसर इथल्या एका कृषी खतनिविष्ठा केंद्रातून मुदतबाह्य खत विक्रीचा प्रकार उघडकीस आला आहे.
जिल्ह्यात युरियाचा वापर : पालघर जिल्ह्यात खतांचा विशेषतः युरियाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला जातो. औद्योगीकरणासाठी हा युरिया वापरला जातो. अनेकदा शेतीसाठी असलेला युरिया औद्योगिक प्रकल्पाकडं गेल्यामुळं शेतकऱ्यांना खताची टंचाई जाणवते. त्याचबरोबर ऐनवेळी पिकांना खतं मिळत नसल्यामुळं उत्पादकता घटते. यापूर्वी बोगस खतांच्या विक्रीचे प्रकारही उघडकीस आले होते.
मिरचीसाठी मुदतबाह्य खतं : पालघर तालुक्यात हितेंद्र राऊळ यांची दहा एकर तर, डहाणू तालुक्यात बारा एकर शेती आहे. या शेतीत त्यांनी शिमला मिरची तसेच तिखट मिरचीची लागवड केली आहे. त्यासाठी त्यांनी खतविक्रेत्याकडून खत विकत घेतलं होतं. त्यांनी या खताचा वापर केल्यानं पिकांना फायदा होण्याऐवजी तोटा झाला. नंतर खताची गोणी, बिल आणि त्यावरील मुदत पाहिल्यानंतर मुदतबाह्य खतं दिल्याचं राऊळ यांच्या लक्षात आलं. त्यांनी ही बाब संबंधित खत विक्रेत्याच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली.
नुकसानाला जबाबदार कोण? : शेतकरी राऊळ यांनी खताची गोणी, पावतीसह जिल्हा तसंच तालुका कृषी अधिकाऱ्यांकडं तक्रार केली. परंतु, त्याची गांभीर्यानं दखल घेतली गेली नाही. तक्रारीपासून आतापर्यंत या खत विक्रेत्याकडून मुदतबाह्य किती खतांची विक्री झाली आणि या खतामुळं पिकांचं नुकसान झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होत आहे.
गोदामाची तपासणी; परंतु सील नाही : गुण नियंत्रण विभागाकडं दिलेल्या तक्रारीची फार गाजावाजा झाल्यानंतर आता दखल घेण्यात आली. गुरुवारी खतविक्रेत्याची जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात चौकशी केली. नंतर खतविक्रेत्याच्या गोदामाची तपासणी केली. यावेळी कालबाह्य झालेलं खत आढळूनही दुकान सील केलं नाही. याबाबत संबंधित दुकानदाराला आपलं म्हणणं मांडण्यासाठी मुदत दिली असून अजूनही कारवाई करण्यात आली नाही.
"बोईसर येथील दुकानदार रवी जैन यांच्या दुकानातून १५ ते २० मुदतबाह्य गोण्या आढळून आल्या आहेत. या प्रकरणी त्यांना खुलासा मागविण्यात आला आहे. त्यांच्यावर शंभर टक्के कारवाई होईल." - लक्ष्मण लामकामे, पालघर जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक
कर्मचाऱ्यावर जबाबदारी ढकलून मोकळे : गुणनियंत्रक निरीक्षक लक्ष्मण लामकामे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कालबाह्य गोणी आढळल्याचं मान्य केलं. "या ठिकाणी १५-२० खतांच्या गोणी वेगळ्या बाजूला काढून ठेवण्यात आल्या होत्या. कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळं शेतकऱ्याला मुदतबाह्य खतं विकण्यात आल्याचं दुकानदारानं सांगितलं. या प्रकरणी निश्चित कारवाई होणार आहे. दोन-तीन महिन्यासाठी संबंधित खत विकण्याचा परवाना निलंबित करण्यात येईल." असं त्यांनी सांगितलं.
तुम्ही म्हणत असाल, तर कायमचा परवाना रद्द : मुदतबाह्य खते विकण्याचा प्रकार गंभीर असून फक्त दोन-तीन महिन्यासाठीच परवाना निलंबित करणार का? अशी विचारणा करता तुम्ही म्हणत असाल तर कायमस्वरुपी परवाना निलंबित करतो, असं उत्तर जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षकांनी दिलं. दरम्यान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात झालेल्या सुनावणी दरम्यान कृषी केंद्राचे चालकांनी सुनावणी दरम्यान नजरचुकीनं कामगाराकडून मुदतबाह्य रासायनिक खते देण्यात आल्याची कबुली दिली. याप्रकरणी संबंधितांकडून खुलासा मागवण्यात आला आहे.
हेही वाचा :