महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

नवख्या आबिटकरांचं पालकमंत्री पद लागलं खटकायला, मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार क्षीरसागर यांची उघड नाराजी - GUARDIAN MINISTER

कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावरून जिल्ह्यात नाराजी नाट्य पाहावयास मिळत आहे. आबिटकरांचं पालकमंत्रिपद मुश्रीफ क्षीरसागर यांना खटकायला लागल्याचं दिसतंय.

हसन मुश्रीफ आणि राजेश क्षीरसागर
हसन मुश्रीफ आणि राजेश क्षीरसागर (संग्रहित फोटो)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 21, 2025, 4:32 PM IST

Updated : Jan 21, 2025, 6:30 PM IST

कोल्हापूर : राज्यातील पालकमंत्री नेमणूक आणि त्यानंतरची स्थगिती यातून महायुतीत सर्वकाही अलबेला नाही हे दिसत आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, नियुक्ती झाल्यापासून पालकमंत्री पदावर डोळा असलेल्या मंत्री मुश्रीफांनी उघड-उघड नाराजी व्यक्त केली. तर, एका सार्वजनिक कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्ह्यातील शिलेदार आमदार राजेश क्षीरसागर यांनीही मनातील खदखद बोलून दाखवली. राधानगरी विधानसभेतून सलग तीनवेळा निवडून आलेल्या प्रकाश आबिटकर यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळालं. तर, पालकमंत्री पदाची माळ ही त्यांच्याच गळ्यात पडल्यामुळं नवख्या आबिटकरांचं पालकमंत्रीपद मंत्री मुश्रीफ आणि आमदार क्षीरसागर यांना चांगलंच खटकलं असून महायुतीतील रुसवे-फुगवे चव्हाट्यावर येत आहेत.

शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणारे पहिले माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडे मंत्रीपद दर्जा असलेले राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्षपद आहेत. तर, मित्रा या संस्थेचे ते उपाध्यक्ष आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील नेते म्हणून त्यांची ओळख आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून यंदाच्या विधानसभेत निवडून आल्यानंतर मंत्रिपदी वर्णी लागेल अशी क्षीरसागर यांना खात्री होती. मात्र, जिल्ह्याला उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेकडून एकच मंत्री पद मिळालं. सलग तीनवेळा विधानसभेत पोहोचलेल्या प्रकाश आबिटकर यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाली. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून जिल्ह्यातील एकमेव आमदार आणि कागल विधानसभेत डबल हॅट्रिक केलेले ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनाही वैद्यकीय शिक्षण खाते मिळालं. मंत्रिपद मिळाल्यानंतर मंत्री मुश्रीफ यांनी मुंबईत मुक्काम ठोकत कोल्हापूरच्या पालकमंत्री पदासाठी लॉबिंग केलं होतं. मात्र, महायुतीतील वरिष्ठ नेत्यांनी कोल्हापूरचं पालकमंत्री पद उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे दिलं आणि या पदावर आबिटकरांची नेमणूक करण्यात आली. तीन दिवसांपूर्वी झालेल्या पालकमंत्री नेमणुकीनंतर महायुतीत धुसफूस सुरू झाली असून त्याचे पडसाद कोल्हापूर जिल्ह्यातही उमटत आहेत.


...पालकमंत्री पदानंही दिली हुलकावणी :विधानसभेच्या प्रचारादरम्यान तब्बल १९ वर्ष राज्याच्या मंत्रिमंडळात राहिलेल्या हसन मुश्रीफ यांनी जनतेला उद्देशून या राज्याचा मी उपमुख्यमंत्री होणार आहे, असं भाकीत केलं होतं. मात्र, हे वक्तव्य म्हणजे लोकांचा उत्साह वाढवण्यासाठी बोललो होतो. असा यू-टर्न निवडणुकीनंतर मुश्रीफ यांनी घेतला होता. तर, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पालकमंत्री पदाच्या नेमणुका होण्याआधीच मुश्रीफ यांच्या कागल मतदारसंघात सोशल मीडियावर पालकमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल मुश्रीफ यांच्या अभिनंदनाचे फलक झळकले होते. कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना मुश्रीफ यांनी मी जनतेच्या मनातील पालकमंत्री आहे, असं विधान केलं होतं. यावर जोरदार आक्षेप घेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अनिल घाटगे यांनी मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला, मुश्रीफ जनतेच्या मनातील नव्हे तर फक्त कागलचे पालकमंत्री आहेत, असा हल्लाबोल घाटगे यांनी केला आहे.


आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केली खदखद :पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कोल्हापुरात सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी या कार्यक्रमाला मी पालकमंत्री म्हणूनच आलो असतो. असं विधान करून कोल्हापूर जिल्ह्याचं पालकत्व घेण्याची आकांक्षा क्षीरसागर यांनी बोलून दाखवली, मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर महायुतीच्या दोन्ही मंत्र्यांचे स्वागत करण्यासाठीही क्षीरसागर कोल्हापुरात असूनही स्वागत समारंभाला त्यांनी दांडी मारली होती. यावरून जिल्ह्यातील महायुतीतील नेत्यांची तोंडं तिन्ही दिशेला असल्याचं स्पष्ट होत आहे.

सहकाराचं राजकारण बदलणार : कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण सहकाराच्या संस्थात्मक साखळीनं बांधलं गेलं आहे. पहिल्यांदाच सहकारी संस्था, साखर कारखाने, सहकारी बँका, सूतगिरण्या, शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठी ताकद नसलेला नेता जिल्ह्याचा पालकमंत्री झाला आहे. याचीच सल मंत्री हसन मुश्रीफ यांनी बोलून दाखवली. सातारा जिल्ह्याला शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून पालकमंत्री मिळाला आहे. त्यांच्याकडे स्वतःचा एकच सहकारी साखर कारखाना आहे. तर, सांगली जिल्ह्याची जबाबदारी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे. तसेच कोल्हापूरची जबाबदारी प्रकाश आबिटकर यांच्याकडे असल्याने सहकार क्षेत्रावर पकड मजबूत करायची असेल तर, महायुतीतील नेत्यांनी आपापसातील मतभेद विसरून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत एकत्रित सामोरे जाण्याची गरज निर्माण झाली आहे.

हेही वाचा :

पालकमंत्री पदावरून महायुतीत नाराजी, कशामुळे होतोय राजकीय गदारोळ?

प्रजासत्ताक दिनी कोण कुठं करणार ध्वजवंदन, मुख्यमंत्री कुठे करणार ध्वजवंदन?

रायगडसह नाशिकच्या पालकमंत्री निवडीला स्थगिती, महायुतीमधील नाराजीनंतर सरकारवर नामुष्की

Last Updated : Jan 21, 2025, 6:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details