छत्रपती संभाजीनगर Manoj Jarange Patil : तुमच्या नावाचा उल्लेख करताना एकेरी भाषा नको असेल तर मागण्या मान्य करा अशी टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलीय. तसंच दिलेलं दहा टक्के आरक्षण ओबीसी मधून द्यावं आणि केंद्रातून ते वाढवून घ्यावं तरच हा विषय मार्गी लागू शकतो. तसंच एसआयटी चौकशी पूर्ण होण्याआधीच मला अटक करण्याची तयारी सुरू केलीय, असं जर झालं तर मला ज्या मार्गानं न्याल त्या मार्गावर तुम्हाला करोडो मराठा दिसतील, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिलाय.
मराठा समाज आहे मागास : यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, "कोणत्याही समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्या समाजाचं मागासलेपण सिद्ध झालं पाहिजे. त्यामुळं आता झालेल्या सर्वेक्षणात मराठा समाज हा मागास सिद्ध झालाय. आता आरक्षण देण्यात अडचण असायला नको, सरकारनं दहा टक्के आरक्षण जाहीर केलं, मात्र ते टिकणारं नाही. त्यामुळंच ओबीसी मधून आरक्षण द्यावं आणि आरक्षणाची मर्यादा वाढवून घ्यावी हा एकच पर्याय राहिलेला आहे. जोपर्यंत या मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत माझं आंदोलन मागं घेणार नाही." तसंच टीका करणाऱ्यांनी, मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात दिलेली माहिती ऐका म्हणजे मराठा समाज मागास आहे, हे स्पष्ट होईल असं देखील त्यांनी सांगितलं.
मराठा नेत्यांनी सोबत राहा : गेल्या दोन दिवसांपासून मराठा समाजाचे नेते आणि कार्यकर्ते देखील आपल्या नेत्यांची भाषा बोलू लागले आहेत. नेत्यांवर टीका केली की इतकं का लागलं? यापेक्षा समाजासाठी त्यांच्याकडं भांडा असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं. मी जो लढा लढत आहे, तो मराठा समाजाच्या युवकांसाठी आहे. तुमच्या येणाऱ्या पिढ्या यामुळं चांगल्या होतील. त्यामुळं मराठा समाजाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांची किंवा पक्षाची बाजू घेऊन भांडण्यापेक्षा, मराठा समाजाला आरक्षणाबाबत अद्याप का निर्णय झालेला नाही? असा जाब विचारावा. दिलेलं आरक्षण टिकणारं नसल्यानं ओबीसी मधूनच आरक्षण द्या आणि कोटा वाढवून घ्या असा आग्रह धरावा, म्हणजे समाज तुमच्या पाठीशी राहील आणि तुम्हाला लक्षात ठेवेल. अन्यथा त्याचं नुकसानही तुम्हालाच होईल, असा इशारा देखील जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या नेत्यांना दिला. तर आरक्षण मिळाल्यावर त्याचा सर्वात आधी फायदा हे नेतेमंडळी आणि कार्यकर्तेच घेतील, अशी टीका देखील त्यांनी केलीय.