मुंबई Thackeray Group Manifesto :शिवसेना ठाकरे गटाचा जाहीरनामा गुरुवारी (25 एप्रिल) सायंकाळी प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाराष्ट्रावर केंद्राकडून होणाऱ्या अन्यायापासून मुक्ती देण्याचं आश्वासन दिलं. महाराष्ट्रातून उद्योगधंदे बाहेर जात असून महाराष्ट्राचं वैभव पुन्हा प्राप्त करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले.
शेतकऱ्यांवर विशेष लक्ष : या जाहीरनाम्यात शिवसेना ठाकरे गटानं शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विशेष लक्ष केंद्रित केल्याचं दिसून आलं. याबाबत उद्धव ठाकरे म्हणाले की, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणं शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्यात येईल. सरकार जीएसटीच्या रूपात शेतकऱ्यांकडून हजारो रुपयांचा टॅक्स वसूल करत असून त्या बदल्यात सहा हजार रुपये देतंय. शेतकऱ्यांची ही पिळवणूक थांबवून आम्ही त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करू. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली जाईल. तसंच पिकाचं नुकसान झाल्यास जो पीक विमा मिळतो त्यासाठी अनेक जाचक अटींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. या सर्व जाचक अटी खासगी कंपन्यांनी ठरवलेल्या आहेत, त्या बदलून आम्ही योग्य ते निकष लावून शेतकऱ्यांना लवकरात लवकर कसा विमा मिळेल याची तरतूद करू, असंही ते म्हणाले.
हुकूमशाही संपवण्याची संधी : पुढं ते म्हणाले की, "आपला देश हुकूमशाहीकडं वाटचाल करतोय. लोकसभा निवडणुकीच्या रूपानं आपल्याला हुकूमशाही संपवण्याची संधी मिळाली आहे. संपूर्ण देशावर केवळ एकाच व्यक्तीचा अधिकार असावा, असं होऊ नये. संविधानाची संघराज्य पद्धत असून त्याला अनुसरून कारभार झाला पाहिजे, हे आमचं मत आहे. मी गुजरातच्या विरोधात नाही, महाराष्ट्राला लुटून गुजरातमध्ये पाठवलं जातंय. प्रत्येक राज्याच्या हक्काचं त्या-त्या राज्याला मिळायलाच हवं."