मुंबई :विधानसभा निकालावर शरद पवार यांनी शंका उपस्थित केली होती. त्यांनी शनिवारी कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेत मतदानाची संपूर्ण आकडेवारीच सादर केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळालेल्या मतांवर शरद पवार यांनी सवाल उपस्थित केला. शरद पवार यांनी मांडलेल्या आकडेवारीला आता खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर देत पलटवार केला.
काय म्हणाले होते शरद पवार?: "विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला जास्त मतदान झालं तरीही त्यांना केवळ 16 जागा मिळाल्या. तर शिवसेना आणि राष्ट्रवातीला कमी मतदान होवून सुद्धा जास्त जागा कशा मिळाल्या?" असा सवाल शरद पवार यांनी विचारला होता. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही लोकसभेत महाविकास आघाडीला आणि महायुतीला पडलेल्या मतदानाची टक्केवारी सांगत विरोधकांवर पलटवार केला.
प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (ETV Bharat Reporter) एकनाथ शिंदेंनी मांडली लोकसभेची आकडेवारी : "लोकसभेत महायुतीला 43.55 टक्के मतं मिळाली, तर महाविकास आघाडीला 43.71 टक्के मतं मिळाली. दोघांच्या टक्केवारीत केवळ काही आकड्यांचा फरक आहे. पण आम्हाला केवळ 17 जागा मिळाल्या आणि त्यांना 31 जागा मिळाल्या - मग त्यावेळी त्यांनी EVM घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित का केला नाही?" असा सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना विचारला.
...म्हणून काँग्रेसला जास्त मतं मिळाली : "विधानसभेला काँग्रेसनं जास्त जागा लढवल्या होत्या. शिवसेनेनं त्यांच्यापेक्षा कमी जागा लढवल्या होत्या. काँग्रेसनं जास्त जागा लढवल्यामुळं त्यांना जास्त मतं मिळाली. विरोधात निकाल लागला तर टीका करतात, हा प्रकार लोकशाहीला घातक आहे. मविआच्या विजयी उमेदवारांनी शनिवारी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आमदारकीची शपथ घेतली नव्हती, त्यांचा ईव्हीएम आक्षेप होता. आज त्यांनी आमदारकीची शपथ घेतली, मग ईव्हीएमवरील आक्षेप दूर झाला का?" असा प्रश्न शिंदेंनी विचारला.
जिंकता तिथं ईव्हीएम चांगलं कसं? : "महाराष्ट्रातील जनतेनं दिलेल्या स्पष्ट बहुमताचं विरोधकांनी स्वागत केलं पाहिजे. आमच्या अडीच वर्षांच्या महायुती सरकारनं खूप कामं केली, अनेक योजना राबवल्या, त्याचाच परिणाम आहे. नुकत्याच झारखंडमध्ये आणि वायनाडमध्येही निवडणुका झाल्या. जिथे ते जिंकतात तिथे ईव्हीएम चांगलं असतं असं कसं?गेली अनेक वर्षे हेच सुरू आहे," असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला.
वक्फ बोर्डाकडून नोटीस :विधानसभेच्या विशेष अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लातूरमधील शेतकऱ्यांना महाराष्ट्र वक्फ बोर्डाकडून आलेल्या नोटीसांबाबत भाष्य केलं. एकनाथ शिंदे म्हणाले, “हे सामान्य लोकांचं सरकार आहे. त्यामुळं या प्रकरणात कोणावरही अन्याय होऊ देणार नाही.”
हेही वाचा -
- “शरद पवारांनी या वयात खोटारडेपणा करु नये", चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल
- मतदान कमी असतानाही शिंदे-पवारांचे जास्त आमदार कसे? शरद पवारांनी मांडली आकडेवारी
- "ईव्हीएम हटाव चळवळ सुरू ठेवून न्यायालयीन लढा देणं महत्त्वाचं"-शरद पवार