मुंबई Eknath Shinde Sharad Pawar Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी भेट झाली. या भेटीमागे साखर कारखानदारांच्या थकहमीचा विषय असल्याची प्राथमिक माहिती दिली जात आहे. या भेटीनंतर थकहमीबाबत यशस्वी चर्चा झाल्याचं ही पवारांनी म्हटलंय. मात्र, या भेटीदरम्यान अदानी उद्योग समूहाचे दोन अधिकारी उपस्थित असल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आलंय.
मविआतील काँग्रेस आणि शिवसेनेचा धारावीला विरोध : महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचा धारावीच्या पुनर्वसन प्रकल्पाला विरोध आहे. धारावीकरांना योग्यरित्या पुनर्वसित केलं जात नसल्याचा आरोप करत या दोन्ही पक्षांनी आक्रमक भूमिका घेतलीय. मात्र, असं असताना शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळं शरद पवारांच्या पक्षाची भूमिका वेगळी आहे का? असा सवाल उपस्थित केला जातोय.
वरून दोस्ती आतून कुस्ती : या संदर्भात बोलताना शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे म्हणाल्या की, "वास्तविक शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीमुळं काही लोकांच्या पोटात दुखायला लागलंय. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या पोटात दुखत आहेत. ते या भेटीमागचा वेगळा अर्थ काढत आहेत. एकीकडं वरून दोस्ती दाखवायची आणि आतून कुस्ती करायची, अशीच संजय राऊत यांची प्रवृत्ती आहे. तुमच्या मित्र पक्षातील नेत्यांनाच तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत आहात. उद्योगपतींचे लाड कोणी पुरवले? हे अंबानीच्या लग्नात नुकतंच दिसून आलंय", असंही वाघमारे म्हणाल्या.