मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी लोकसभा निवडणूक ही लिटमस टेस्ट ठरणार आहे. कारण दोन्ही नेत्यांनी पक्षांमध्ये बंडखोरी करत पक्षाचे चिन्ह आणि नाव मिळविण्यात यश मिळविलं आहे. मात्र, मतपेटीमधून मिळणारा कौलच त्यांच्या पुढील राजकारणाची दिशा ठरणार आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासमोर सर्वात मोठं आव्हान आहे. कारण, दोन्ही नेत्यांनी आपल्या पक्षाचे नाव आणि चिन्ह गमाविलं आहे. भारतीय निवडणूक आयोग आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजित पवार गटाकडं राष्ट्रवादीचे चिन्ह आणि नाव दिलं. तर शिंदे गटाकडं शिवसेनेचे नाव आणि चिन्ह दिलं.
वरिष्ठ पत्रकार आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रकाश अकोलकर म्हणाले, " उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना निवडणुकीत प्रभावी कामगिरी दाखवावी लागणार आहे. कारण, त्यांच्या राजकीय अस्तित्वाला धोका निर्माण झाला. उद्धव ठाकर गटाला लोकसभेच्या ७ ते ८ जागांवर विजय मिळवावा लागणार आहे. कारण, वर्षभरातच विधानसभा निवडणुका आहेत. भाजपबरोबर युती असताना शिवसेना ठाकरे गटानं लोकसभेच्या अनेक जागा निवडणुका लढविल्या होत्या. सध्या, ठाकरे गटाकडून केवळ २१ जागांवर उमेदवार देण्यात आले आहेत. त्यातील काही जागांवरही काँग्रेसकडून दावा करण्यात येत आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युलानुसार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट १० जागांवर निवडणूक लढवित आहे. मात्र, शरद पवारांसमोर बारामती लोकसभा मतदार संघात मोठं आव्हान आहे. कारण त्यांची कन्या आणि तीन वेळा खासदार झालेल्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवित आहेत.
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अकोलकर म्हणाले, जर शरद पवार हे बारामतीत पराभूत झाले तर, त्यांच्यासाठी मोठा पराभव असेल. पवार कुटुंबासाठी अनेक वर्षांपासून बारामती लोकसभा मतदारसंघ सांभाळणाऱ्या अजित पवार यांच्याविरोधात शरद पवार यांची लढाई आहे. ८३ वर्षीय पवार हे त्यांच्या ५० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत कधीच पराभूत झाले नाहीत. तर उद्धव ठाकरे यांनी आजवर कधीही निवडणूक लढविली नाही. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे विधानपरिषदेतून निवडून आले होते. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे कधीही घराबाहेर पडले नाहीत, अशी भाजपाकडून आजवर सातत्यानं टीका केली. मात्र, लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे राज्यभरात दौरे करत आहेत. त्यांच्या सभेला चांगला प्रतिसाददेखील मिळत आहे. सुप्रिया सुळे यांचा विजय सुकर होण्याकरिता शरद पवार हे प्रयत्न करत आहेत. शरद पवार यांनी एकेकाळचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेसचे नेते अनंत थोपटे यांची भेट घेतली होती.
महाविकास आघाडीची प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितबरोबरची बोलणी अपयशी ठरल्यानं राज्यात तिरंगी निवडणूक होणार आहे. त्याचा थेट फायदा महायुतीला होईल, अशी शक्यता ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अकोलकर यांनी व्यक्त केली.