मुंबई Ashish Shelar Open Challenge to Aaditya Thackeray : उद्धव ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या होमग्राउंड ठाणे येथे निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय. आदित्य ठाकरे ठाण्यातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुलं आव्हान दिलं आहे. यावरून भाजपा नेते, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. वरळीतील जनता आमदार हरवले आहेत. तुमचा शोध घेत असल्याचा टोला भाजपा नेते शेलार यांनी लगावला.
ठाणे पुन्हा एकदा शिवसेनेला जिंकून देणार : आदित्य ठाकरे यांनी ठाण्यामध्ये सभा घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारला धारेवर धरत हल्लाबोल केला. कुठल्याही परिस्थितीमध्ये आदित्य ठाकरे ठाणे पुन्हा एकदा शिवसेनेला जिंकून देणार, असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसंच ते म्हणाले, "आता गद्दार निघून गेले असून मतदार आमच्यासोबत आहेत. तसंच नगर विकास खात्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते", असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला.
पालकमंत्री असताना भेटायला वेळ नव्हता : आदित्य ठाकरे यांच्या ठाण्यातील सभेनंतर भाजपा नेते, मुंबई अध्यक्ष, आशिष शेलार यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. आशिष शेलार यांनी या संदर्भात एक्सवर पोस्ट शेअर केली. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की, "ज्या वरळी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व आमदार आदित्य ठाकरे करतात, त्या वरळीतील झोपडपट्टी पुनर्विकासाचे प्रकल्प हे मागील 20 वर्षाहून अधिक काळ रखडले आहे. तेव्हा तुमच्या काळात एकही विट येथे रचली गेली नाही. कोरोना काळात वरळी गावठाण, कोळीवाड्यातील जनतेचे अतोनात हाल झाले. ते हालसुद्धा दुनियेनं पाहिलेत. वरळीच्या कोळी बांधवांचा व्यवसाय कोस्टल रोडच्या खांबांमुळं धोक्यात आला. तेव्हा ते टाहो फोडत होते. अशाप्रसंगी पालकमंत्री असताना सुद्धा कोळी बांधवांना भेटायला तुमच्याकडे वेळ नव्हता", असा खोचक टोलाही शेलारांनी लगावला.
हिम्मत असंल तर द्या राजीनामा : पुढं ते म्हणाले की, "वरळीच्या रहिवाशांना बिडीडी चाळीतील व्यवसायिक गाळे आणि पुनर्विकासीत घरे देणेसुद्धा तुम्हाला जमले नाही. अशात त्यात जमेल तेवढा तुम्ही खोडाच घातलात. कोस्टल रोड तर तुमच्यावेळी न्यायालयात अडकला होता. पोलीस वसाहतील पोलीसांना साधी घरे तुम्ही देऊ शकला नाहीत. वरळीतील जनता आजही तुमचा शोध घेत आहे, आमदार कुठे हरवलेत? अशा प्रसंगी वरळीतून आता निवडून येणे हे शक्य नाही. ठाण्यात जाऊन तुमच्या तोंडाच्या वाफा घालवणे सुरू आहे? रंगरंगोटीच्या नावाखाली वरळीतील दोनचार भिंतीना चुना लावून तुम्ही वरळीतून पळ काढताय? माझे तुम्हाला थेट आव्हान आहे. हिम्मत असंल तर राजीनामा द्या. या वरळीत आमच्या समोर", असं आव्हानही आशिष शेलार यांनी केलंय.
हेही वाचा -
- नगरविकास खात्यासाठी एकनाथ शिंदे 'मातोश्री'वर येऊन रडले होते- आदित्य ठाकरेंचा दावा
- आदित्य ठाकरे शिवडी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार? काय आहेत कारणं? जाणून घ्या
- "पंतप्रधान व्हायचं असेल तर राहुल गांधींनी भाजपामध्ये जावं'; आदित्य ठाकरेंचा सल्ला