मुंबई CM DCM Meeting at Varsha Bungalow : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानपरिषदेच्या 15 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. त्यानंतर लगेचच विधानसभेच्या निवडणुका असल्यानं सध्या राज्यात बैठकांचं सत्र सुरू असल्याचं बघायला मिळतंय. अशातच सोमवारी (17 जून) रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात तब्बल दीड तास बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीची पीछेहाट झाली. त्याचा महायुतीला फटका बसला. महायुतीच्या या पराभवाला कारणीभूत राष्ट्रवादी अजित पवार गट असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तर, अजित पवार गटानंदेखील सर्व आरोप फेटाळत थेट विधानसभेत 80 ते 90 जागांची मागणी केली. तसंच शिवसेना शिंदे गटानंदेखील विधानसभा निवडणुकीसाठी 80 ते 90 जागांची मागणी केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महायुतीत दावे प्रति-दावे सुरू आहेत.
दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये तब्बल दीड तास बैठक-भाजपानंदेखील मोठ्या हालचालींना सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत आज अमित शाह यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीला देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे राज्यातील इतर प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. भाजपाच्या या महत्त्वपूर्ण बैठकीपूर्वी सोमवारी रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये तब्बल दीड तास बैठक झाली. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मोठी खलबत सुरू असल्याचं म्हटलं जातंय.