महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

"तीन दिवसांपासून वेळ मागत होतो..." एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर गिरीश महाजन काय म्हणाले? - GIRISH MAHAJAN ON EKNATH SHINDE

काही दिवसांपासून महायुतीच्या बैठका रखडल्यानं सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झालाय. तोच पेच सोडवण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे.या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली.

Maharashtra govt formation BJP leader Girish Mahajan reaction after meeting with Eknath Shinde at thane
एकनाथ शिंदे, गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 3, 2024, 8:16 AM IST

ठाणे :महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election) महायुती सरकारला बहुमत मिळाल्यानंतर आता राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. 5 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजता आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती समोर येत आहे.

भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री होणार असल्याचं बोललं जातंय. मात्र, यावरुन काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. असं असतानाच भाजपाचे संकटमोचक अशी ओळख असलेले नेते गिरीश महाजन यांनी एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील निवासस्थानी जात सोमवारी रात्री भेट घेतली.

गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)

भेटीनंतर काय म्हणाले? :दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास सव्वा तास चर्चा झाली. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना गिरीश महाजन म्हणाले, "एकनाथ शिंदे यांच्या हाताला अजूनही सलाईन लागलेलं आहे. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी इथं आलो होतो. गेल्या तीन दिवसांपासून मी वेळ मागत होतो. पण ते गावी निघून गेल्यानं त्यांच्याशी माझा संपर्क झाला नाही. मात्र, आज मी त्यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली." तसंच मंगळवारी (3 डिसेंबर) होणाऱ्या बैठकीत एकनाथ शिंदे सहभागी होतील, असंही महाजन यांनी सांगितलं.

जागावाटपाबद्दल काय म्हणाले? :महायुतीच्या (Mahayuti) आगामी सरकारमध्ये कोणाला किती मंत्री‍ पदं मिळणार याबद्दल बोलताना महाजन म्हणाले, "माझी याबद्दल कोणतीही चर्चा झालेली नाही. मी छोटा कार्यकर्ता आहे. आमचे मोठे नेते या जागावाटपाबाबत चर्चा करतील", असं महाजन यांनी सांगितलं. तर एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चांविषयी ते म्हणाले की, "छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी एकनाथ शिंदे चिडून बसणार नाहीत. आम्ही सगळे एकत्र असून आमच्यामध्ये कुठलाही दुरावा नाही."

सत्तास्थापनेचा तिढा सुटला? :गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास समंती दिल्याचं सांगितलं जातंय. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे यांच्याकडं नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अशी मोठी मंत्रिपदं दिली जाऊ शकतात. तर अजित पवार यांना अर्थखातं मिळण्याची शक्यता आहे. गिरीश महाजन यांची भेट आणि शिवसेनेच्या खासदारांच्या विनंतीनंतर महायुतीवरील संकट दूर झाल्याचं बघायला मिळतंय. दरम्यान, मंगळवारी दुपारपर्यंत महायुतीचे नेते आझाद मैदानावर जाऊन शपथविधी सोहळ्याच्या तयारीची पाहणी करणार आहेत.

हेही वाचा -

  1. मुख्यमंत्रिपदाचं नाव निश्चित नसतानाच आझाद मैदानात शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी
  2. राज्यातील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होणार का? आता श्रीकांत शिंदे म्हणतात...
  3. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आजच्या सर्व बैठका रद्द, कारण काय?

ABOUT THE AUTHOR

...view details