मुंबई-राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असली तरी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अद्यापही जागावाटपावरून सुंदोपसुंदी कायम आहे. राजकीय पक्षांतर्गत अदलाबदली अन् नाराजी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांनी रविवारी निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलाय. त्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील 288 विधानसभेच्या जागांसाठी निवडणूक होणार असून, 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत वडील भाजपात अन् मुलगा किंवा मुलगी शिंदेंच्या शिवसेनेत अन् पवारांच्या राष्ट्रवादीतून लढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असताना माजी खासदार राजेंद्र गावित आणि विलास तरे यांनीही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. जून 2022 मध्ये शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाविरुद्ध बंड केले, तेव्हा गावित यांनी त्यांना पाठिंबा दिलाय. रविवारी 20 उमेदवारांची यादी जाहीर करणाऱ्या शिवसेनेने गावित यांना पालघर विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरवलंय.
संदीप नाईक बेलापूर मतदारसंघातून लढणार:माजी मंत्री आणि भाजपाचे नवी मुंबईतील नेते गणेश नाईक यांनासुद्धा भाजपाकडून ऐरोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. तर पुत्र संदीप नाईक हे बेलापूर मतदारसंघातून भाजपाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. परंतु तिथून भाजपाच्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना तिकीट देण्यात आलंय. त्यामुळे संदीप नाईक यांनी 22 ऑक्टोबरला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश केलाय. महाविकास आघाडीनं आता त्यांना मंदा म्हात्रे यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
निलेश राणे कुडाळमधून रिंगणात: भाजपानं जाहीर केलेल्या पहिल्या यादीत कणकवली मतदारसंघातून विद्यमान आमदार नितेश राणेंना संधी दिलीय. नितेश राणे हे भाजपाचे विद्यमान खासदार नारायण राणे यांचे पुत्र आहेत. तर नारायण राणेंचे दुसरे चिरंजीव निलेश राणे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला असून, ते कुडाळ मतदारसंघातून ते ठाकरे गटाच्या वैभव नाईक यांना आव्हान देणार आहेत.