मुंबई -महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा अद्याप सुरू असून, दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि उद्धवसेनेत आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जागावाटपावरून काँग्रेसला निर्वाणीचा इशारा दिलाय. विशेष म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही संजय राऊतांना हा विषय तातडीने संपवण्याचा सल्ला दिलाय.
टायपिंग मिस्टेक आमच्याकडूनसुद्धा होऊ शकते: उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २९ ऑक्टोबर हा शेवटचा दिवस असून, अद्याप महाविकास आघाडीत अनेक मतदारसंघांवरून वाद सुरू आहेत. त्यात दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाकडून अमर पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असताना काँग्रेसनेसुद्धा या मतदारसंघातून दिलीप माने यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. यावरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटात मोठा वाद निर्माण झालाय. यावर बोलताना संजय राऊत यांनी काँग्रेसने सोलापूर दक्षिणमध्ये दिलेला उमेदवार ही टायपिंग मिस्टेक असल्याचं म्हटलंय. अशा पद्धतीची टायपिंग मिस्टेक आमच्याकडूनसुद्धा होऊ शकते आणि तसे झाल्यास महाविकास आघाडीला अडचणी निर्माण होतील, असा गंभीर इशारा दिलाय.
मिरजमध्येसुद्धा काँग्रेस उमेदवार देण्याच्या तयारीत: त्याचप्रमाणे दिग्रस विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि आमच्यात चर्चा झालीय, आम्ही ती जागा काँग्रेससाठी सोडली. या जागेवरून माणिकराव ठाकरे निवडणूक लढवत आहेत. दिग्रसच्या बदल्यात काँग्रेसने दर्यापूर मतदारसंघ आम्हाला सोडलाय. यावर कोणताही वाद नाही, असंही संजय राऊत म्हणालेत. इतकेच नाही तर मिरजमध्येसुद्धा काँग्रेसचे काही लोक त्यांचा उमेदवार देण्याच्या तयारीत असून, जर असं झालं तर ही लागण संपूर्ण महाराष्ट्राला लागेल आणि महाविकास आघाडीसाठी मोठ्या अडचणी निर्माण होतील, असा इशाराही संजय राऊतांनी दिलाय.