नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं शनिवारी सूप वाजलं. केवळ सहा दिवसांच्या हिवाळी अधिवेशनातून विदर्भाला न्याय मिळाला का? यासह अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. विदर्भाला न्याय देण्यासाठी किमान सहा आठवड्यांचं हिवाळी अधिवेशन नागपुरात व्हावं, असं अपेक्षित होतं. मात्र, केवळ एका आठवड्याच्या अधिवेशनातून सरकारनं नागपूर कराराची थट्टा केली आहे का? हा देखील प्रश्न निर्माण झालाय. हिवाळी अधिवेशनाचा कालावधी गेल्या काही वर्षांपासून कमी कमी होत आहे, यंदा तर अवघ्या सहा दिवसांवर आलाय. महत्त्वाचं म्हणजे विरोधकदेखील या मुद्द्यावर फारसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं नाही. विरोधकांच्या मवाळ भूमिकेचा सरकारला फायदा झाल्याचं दिसून येतंय.
सहा दिवसीय नागपूर वारीनंतर विदर्भाला काय मिळालं? :विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर राज्य शासनाचा कोट्यवधींचा खर्च होतो. नेते मंडळी, त्यांचे कर्मचारी, कार्यकर्ते अशा सर्व राजकीय लवाजम्यासह हजारो सरकारी अधिकारी आणि कर्मचारी, सर्वांच्या सुरक्षेसाठी हजारो पोलीस या सर्वांच्या सहा दिवसीय नागपूर वारीनंतर विदर्भाला नेमकं काय मिळालं? असा प्रश्न कायम आहे.
काय सांगतो नागपूर करार : सप्टेंबर 1953 रोजी नागपूर करार संमत झाला. या करारानुसार विधिमंडळाचं एकतरी अधिवेशन किमान सहा आठवडे नागपूर येथे भरवण्यात यावं. 1960 साली पहिलं हिवाळी अधिवेशन भरवण्यात आलं होतं. तेव्हापासून ही परंपरा आजही सुरू आहे. "मराठी भाषकांचं एक राज्य असावं," या भावनेतून राज्यात सहभागी झालेल्या आणि भौगोलिकदृष्ट्या राजधानी मुंबईपासून लांब असलेल्या विदर्भातील जनतेला न्याय मिळावा म्हणून सरकार आपल्या दारी या उद्दिष्टानं उपराजधानी नागपुरात विधिमंडळाच्या एका अधिवेशनाची तरतूद करण्यात आलीय. 12 डिसेंबर 1960 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी विधिमंडळाचं किमान एक अधिवेशन नागपुरात व्हावं, असं मत व्यक्त केलं होतं. तेव्हापासूनच दरवर्षी हिवाळ्यात महाराष्ट्र सरकार विदर्भात अधिवेशन घेऊ लागलंय.
अपेक्षा 6 आठवड्यांची, प्रत्यक्षात 6 दिवसांचं अधिवेशन :सेंट्रल प्रॉव्हिन्सेस आणि बेरार म्हणजेचं सिपी अँड बेरार प्रांताचा भाग असलेला विदर्भ महाराष्ट्रात सहभागी होत असताना तत्कालीन नेत्यांमध्ये घडलेल्या अनौपचारिक "नागपूर करार" झाला होता. त्या करारानुसार विदर्भातील अधिवेशन किमान 6 आठवड्यांचं असावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र, यंदा हिवाळी अधिवेशनाचा कालावधी आता अवघ्या सहा दिवसांवर आला आहे. त्या संदर्भातले राजकीय हेवे-दावे पाहण्यापूर्वी सरकार उपराजधानीत मुक्कामी असतानाच्या सहा दिवसांचा खर्च हा कोट्यवधी रुपयांचा झाला असून, त्याचं फलित काय? हा प्रश्न निर्माण झाला आहे.