महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

अमित ठाकरेंचं टेन्शन वाढलं; सदा सरवणकर निवडणूक लढवणार, सांगितलं 'हे' कारण - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

माहीम विधानसभा मतदारसंघात अमित ठाकरे निवडणूक लढवणार असून त्यांच्यासमोर शिवसेना ठाकरे पक्षाचे महेश सावंत आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांचं तगडं आव्हान असणार आहे.

Maharashtra Assembly Election 2024
अमित ठाकरे, सदा सरवणकर (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 4, 2024, 3:27 PM IST

मुंबई :माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचं सदा सरवणकर यांनी स्पष्ट केलंय. माझा मुलगा समाधान सरवणकर आणि चार पदाधिकारी राज ठाकरेंना भेटायला गेले, मात्र त्यांनी भेट नाकारत तुम्हाला निवडणूक लढवायची आहे तर लढवा असं सांगितलं. त्यामुळं मी आता निवडणूक लढवणार आहे, असं सदा सरवणकर यांनी सांगितलं. त्यामुळं आता माहीम मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचं निश्चित झालं आहे.

राज ठाकरे यांनी भेट घेतली असती तर आपण सकारात्मक प्रतिसाद दिला असता. काहीतरी विचार केला असता. मात्र, त्यांनी भेटच नाकारल्यामुळं आता काय बोलायचं, असं सदा सरवणकर म्हणालेत. सदा सरवणकर यांच्या या भूमिकेमुळं माहीम विधानसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट आला आहे.

अमित ठाकरेंसमोर तगडं आव्हान :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदामात उतरले आहेत. अमित ठाकरे माहीममधून निवडणूक लढवणार असून त्यांच्यासमोर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे महेश सावंत आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांचं तगडं आव्हान असणार आहे.

राज ठाकरेंचे पुत्र पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरल्यानंतर महायुतीमधील काही नेत्यांचा त्यांना पाठिंबा देण्याचा सूर होता. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता. त्यामुळं लोकसभेत मनसेनं एकही उमेदवार उभा केला नाही. त्यात आता विधानसभेत तेही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी उडी घेतली आहे. त्यामुळं त्या माहिम मतदारसंघात महायुती मनसेला पाठिंबा देईल का? सदा सरवणकर उमेदवारी मागे घेणार का? याची चर्चा सुरू होती. या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

हेही वाचा

  1. पटोले म्हणतात, "रश्मी शुक्ला भाजपासाठी काम करतात"; आता शेलार म्हणाले, "नोटीस पाठवणार..."
  2. विनोद तावडे यांच्या मध्यस्थीने अखेर गोपाळ शेट्टी यांचा अर्ज मागे; 'संजय'चा मार्ग मोकळा
  3. मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार; लक्ष्मण हाके म्हणाले, "बारामतीमधून आदेश..."

ABOUT THE AUTHOR

...view details