पुणे : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर करण्यास सुरूवात केलीय. शुक्रवारी (24 ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघातून प्रशांत जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. या मतदारसंघावर ठाकरे गटाकडून दावा सांगण्यात आलेला होता. मात्र, ही शरद पवार गटाला सोडण्यात आलीय. त्यामुळं ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार महादेव बाबर नाराज झाल्याचं समोर आलंय. त्यांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाराजी व्यक्त केलीय.
उद्धव ठाकरेंवर निशाणा : पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे इच्छुक होते. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाकडून माजी आमदार महादेव बाबर हे इच्छुक होते. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून ही जागा आम्हाला मिळावी, यासाठी सातत्यानं प्रयत्न देखील करण्यात आले. पण शुक्रवारी जाहीर झालेल्या उमेदवारीमुळं महादेव बाबर हे नाराज झाले असून त्यांनी थेट महाविकास आघाडीचं कामच करणार नसल्याची आक्रमक भूमिका घेतलीय. त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधलाय.
महादेव बाबर यांनी व्यक्त केली नाराजी (Source - ETV Bharat Reporter) शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडलंय :महादेव बाबर म्हणाले की, "आज आम्ही कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला असून या मेळाव्यानंतर आम्ही आमची भूमिका मांडणार आहोत. आज केवळ मीच नाहीतर अख्खा पुणे जिल्हा नाराज झालाय. जिल्ह्यातील सगळे शिवसैनिक नाराज आहेत. जिल्ह्यात अजुन एकही मशालचा उमेदवार दिला नाही, मग शिवसैनिकांनी काम कसं करायचं. पक्ष प्रमुखांनी हजारो शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडलंय."
फक्त 40 सेकंद आम्हाला दिले :"आम्ही महाविकास आघाडीसोबत राहणार नाही. तसंच मी आजपासून शिवसेनेचं काम करणार नाही. मी मुंबईत संजय राऊत यांना भेटलो होता. तेव्हा ते म्हणाले होते की, शरद पवार स्वतः सांगत आहेत सर्वेमध्ये तुमचा आघाडीवर आहे. त्यांनी त्यावेळी असं सांगितलं, मग मला आता उमेदवारी का दिली नाही?" असा सवालही महादेव बाबर यांनी यावेळी केला. "उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर गेलो होतो. सहा तास थांबलो त्यांनी फक्त 40 सेकंद आम्हाला दिले. प्रयत्न सुरू आहेत असं म्हणून ते निघून गेले." अशा शब्दात महादेव बाबर नाराजी व्यक्त केलीय.
हेही वाचा
- विधानसभेसाठी मनसेची चौथी यादी जाहीर; कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
- EXCLUSIVE : "देवेंद्र फडणवीस यांच्या जनसेवेची 25 वर्ष पूर्ण", पत्नी अमृता आणि लेक दिविजा काय म्हणाल्या? पाहा व्हिडिओ
- वरळीत आदित्य ठाकरेंसमोर मिलिंद देवरा, संदीप देशपांडेंचं आव्हान; पक्षीय बलाबल कसं?