कोल्हापूर :राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार असल्याची घोषणा निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मंगळवारी (15 ऑक्टोबर) केली. कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघांतही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जिल्ह्यात 10 जागांपैकी 8 जागांवर थेट महाविकासआघाडी विरोधात महायुती अशी लढत होणार आहे. तर एका जागेवर जनसुराज्यशक्ती पक्ष आणि एका जागेवर अपक्ष उमेदवार कडवी झुंज देणार आहे. संभाव्य लढती अजूनही स्पष्ट नसल्या तरी उमेदवारांकडून पक्षीय पातळीवरच्या हालचालींना वेग आलाय. राज्यातील महत्त्वाचे दोन पक्ष फुटल्यानंतर विधानसभेची ही पहिलीच निवडणूक असल्यानं जिल्ह्यात यंदा 'टफ फाईट' बघायला मिळणार आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ :कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात 2019 मध्ये शिवसेनेचे राजेश क्षीरसागर, काँग्रेसचे चंद्रकांत जाधव भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सतीशचंद्र कांबळे यांच्यासह 9 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत शहरातील अंतर्गत प्रश्नांपेक्षा राजेश क्षीरसागर यांना असणारा विरोध मतपेटीतून पाहायला मिळाला. काँग्रेसन या जागेवर विजय मिळवला. पुढे 2022 मध्ये चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनानं त्या ठिकाणी पोटनिवडणूक लागली आणि या लढतीत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव विजयी झाल्या. मात्र, भाजपानं पोटनिवडणुकीत दिलेल्या लढतीमुळे आता ही जागा महायुतीतील भाजपाकडे जाते की मुख्यमंत्र्यांकडे असलेलं आपलं वजन वापरून राजेश क्षीरसागर तिकीट मिळवतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार.
महायुतीकडून पोटनिवडणूक लढलेले सत्यजीत कदम, कृष्णराज महाडिक इच्छुक आहेत. तर महाविकास आघाडीकडून या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचे संजय पवार, रविकिरण इंगवले, शरदचंद्र पवार पक्षाकडून आर. के. पवार आणि काँग्रेसकडून राजघराण्यातील सदस्य मधुरिमाराजे छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे यांच्यापैकी कोण रिंगणात असणार याचा निर्णय लवकरच होईल.
शौमिका महाडिक निवडणुकीच्या मैदानात उतरणार? :कोल्हापूर शहराला लागून असलेल्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील लढत पारंपरिक राजकीय विरोधक महाडीक आणि सतेज पाटील कुटुंबियातील उमेदवारांतच झाली होती. यंदाही तशीच लढत पाहायला मिळणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून अमल महाडीक आणि काँग्रेसचे ऋतुराज पाटील यांच्यात 'हाय होल्टेज' लढत पाहायला मिळाली. 74 टक्के मतदान झालेल्या लक्षवेधी लढतीत ऋतुराज पाटील यांनी बाजी मारली. यंदाच्या वर्षी विद्यमान आमदार ऋतुराज पाटील यांच्या विरोधात अमल महाडिक असणार की महिला मतदारांची सर्वाधिक संख्या असल्यानं शौमिका महाडिक यांना मैदानात उतरवलं जातं का? हे पाहणं लक्षवेधी असणार आहे.
करवीर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील विरोधात चंद्रदीप नरके अशी लढत झाली होती. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या 710 मतांनी चंद्रदीप नरके विजयी झाले होते. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा बदला घेत काँग्रेसचे पी.एन. पाटील यांनी 22 हजार 661 मतांनी विजय मिळवला. मात्र, यंदा 23 मे रोजी आमदार पी. एन. पाटील यांचं निधन झाल्यानं या जागेवर त्यांचे सुपुत्र राहुल पाटील काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेच्या रिंगणात असणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून माजी आमदार चंद्रदीप नरके यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जातेय, तर जनसुराज्य शक्ती पक्षाकडून संताजी घोरपडे यांनीही विधानसभेची तयारी केलीय.
शिरोळ विधानसभा मतदारसंघ : ऊस दर आंदोलनाचं केंद्र असलेल्या शिरोळ तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने अशी मातब्बर मंडळी असताना मुख्यमंत्री शिंदे यांना पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यंदाही विधानसभेच्या आखाड्यात उतरणार आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार उल्हास पाटील, काँग्रेसकडून गणपतराव पाटील तर तिसरी आघाडी असलेल्या महाशक्ती परिवर्तनकडून सावकार मादनाईक यापैकी कुणाच्या नावावर उमेदवार म्हणून मोहोर लागते, हे पाहावं लागेल.
चंदगडमध्ये शरद पवार विरुद्ध अजित पवार सामना : कर्नाटक आणि गोवा राज्याला लागून असलेला आणि राज्याचा दक्षिणेकडील शेवटचा मतदारसंघ अशी ओळख असलेला चंदगड विधानसभा मतदारसंघाची यंदाच्या निवडणुकीत समीकरणं बदलली आहेत. भाजपासोबत सत्तेत सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विद्यमान आमदार राजेश पाटील यांची उमेदवारी जाहीर केलीय. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून नंदाताई बाभुळकर यांना उमेदवारी देण्यात आलीय. त्यामुळं चंदगडचा सामना राष्ट्रवादीच्याच दोन उमेदवारांमध्ये होणार असून शरद पवार विरुद्ध अजित पवार अशा या लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. तर शिवसेनेचे संग्राम कुपेकर, भाजपाचे शिवाजीराव पाटील, काँग्रेसचे अप्पी पाटील या बंडखोरांना रोखण्याचं आव्हान महाविकास आणि महायुतीसमोर असणार आहे.