नागपूर : उपराजधानीत शेखू आणि हिरणवार टोळीतील युद्ध पुन्हा भडकण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. गुरुवारी खपरखेडा भागातील बाभूळखेडा शिवारामध्ये शेखू टोळीच्या गुंडांनी हिरणवार टोळीचा पाठलाग करत अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात पवन हिरणवार या तरुणाचा मृत्यू झालाय. घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. अद्यापही या प्रकरणी कुणाला अटक झालेली नसली, तरीही काही संशयित पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
पवन हिरणवार याच्यावर विविध गुन्हे दाखल : गुरुवारी खापरखेडा परिसरात करण्यात आलेल्या अंदाधुंड गोळीबारात पवन हिरणवार याचा मृत्यू झाला आहे. पवन हिरणवार हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. त्याच्यावर हत्यासह अनेक गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलीस तपासात पुढं आली आहे. पूर्व वैमनस्यातून त्याची हत्या झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
टोळीचा सिनेस्टाईल गोळीबार : पवन धीरज हिरणवार दोन मित्रांसह कारनं जात होता. यावेळी खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बाभूळखेडा शिवारात तीन दुचाकीनं आलेल्या पाच आरोपींना त्यांचा पाठलाग सुरू केला. पवन हिरणवार वेगानं कार पळण्याचा प्रयत्न करत असतानाच आरोपींनी कारवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या गोलीबारात एक गोळी पवन हिरणवारला लागली. त्यामुळे पवन हिरणवारचा घटनास्थळीचं मृत्यू झाला आहे, तर दोघं जखमी झाले आहेत.
गोळीबारानंतर आरोपी फरार : गोळीबार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. गोळीबाराचा आवाज ऐकून जवळच्या शेतात काम करणाऱ्या नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर खापरखेडा पोलीस आणि गुन्हे शाखेचं पथक घटनास्थळी दाखल झालं. या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहेत. काही संशयित पोलिसांच्या रडारवर आहेत.
हेही वाचा :