महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

बडनेरा मतदारसंघात रवी राणाच 'किंगमेकर', जाणून घ्या या मतदारसंघाचा इतिहास

अमरावतीतील बडनेरा विधानसभा मतदारसंघ नेहमीच चर्चेत राहिलाय. या मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून विजयाची हॅट्ट्रिक साधणारे रवी राणा आता चौथ्यांदा विजय राखणार का? हे पहावं लागेल.

By ETV Bharat Marathi Team

Published : 9 hours ago

Updated : 6 hours ago

MAHARASHTRA ASSEMBLY ELECTIONS 2024
बडनेरा मतदारसंघाचा इतिहास (Source - ETV Bharat)

अमरावती :अमरावती जिल्ह्यात एकूण आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. सर्वच विधानसभा मतदारसंघातील राजकारण नेहमीच चर्चेत राहिलंय. मात्र, अमरावती शहराचा अर्धा भाग आणि काही ग्रामीण भाग एकत्र करून तयार झालेला बडनेरा विधानसभा मतदारसंघ सर्वांचं लक्ष वेधून घेणारा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून विजयाची हॅट्ट्रिक साधणारे आमदार रवी राणा आता चौथ्यांदा आपला विजय कायम ठेवणार? की बडनेरा मतदारसंघात परिवर्तन होणार हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

बडनेरा मतदार संघाचा इतिहास :1962 मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसनं बडनेरा विधानसभा मतदारसंघ जिंकला. त्यावेळी पुरुषोत्तम देशमुख आमदार म्हणून निवडून आले होते. 1962 नंतर अवघ्या पाच वर्षांत बडनेरा विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी काँग्रेसऐवजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला पाठिंबा दिला. 1967 च्या निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कृष्णराव श्रींगारे विजयी झाले. 1972 च्या निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा काँग्रेसच्या पुरुषोत्तम देशमुख यांना साथ दिली. 1978 मध्ये बडनेरामधून काँग्रेसचे मंगलदास यादव निवडून आले. काँग्रेसचे राम मेघे यांनी बडनेरा विधानसभा मतदारसंघाचं 1980 आणि 1985 मध्ये सलग दोन निवडणुकांमध्ये प्रतिनिधित्व केलं. मात्र, 1990 मध्ये शिवसेनेनं बडनेरा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचं वर्चस्व संपुष्टात आणलं.

रवी राणांनी विजयाचा महामेरू कायम राखला :1990 च्या निवडणुकीत शिवसेनेचे प्रदीप वडनेरे हे बडनेरामधून विजयी झाले होते. त्यानंतर 1995 आणि 1999 अशा सलग दोन निवडणुकांमध्ये शिवसेनेचे ज्ञानेश्वर धाने यांनी बडनेरा विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवला. बडनेरा विधानसभा मतदारसंघ हा 2004 मध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता, मात्र राष्ट्रवादीच्या सुलभा खोडके यांनी मोठा विजय मिळवला. 2009 च्या निवडणुकीत राजकारणात नवख्या असलेल्या रवी राणा यांनी सुलभा खोडके यांचा 18 हजार 771 मतांनी पराभव करून संपूर्ण अमरावती जिल्ह्याला धक्का दिला. पुढे 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत रवी राणा यांनी आपल्या विजयाचा महामेरू बडनेरा विधानसभा मतदारसंघात कायम राखला.

राणांच्या विजयाची कहाणी :अमरावतीच्या विद्यमान आमदार सुलभा खोडके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस असणारे त्यांचे पती संजय खोडके या राजकारणातील अतिशय मुरब्बी नेत्यांनी आणि त्यांच्या बलाढ्य समर्थकांनी बडनेरा विधानसभा मतदारसंघात रवी राणा यांच्यासमोर हात टेकले. 2009 च्या निवडणुकीत रवी राणा यांचा खोडके समर्थकांशी जोरदार संघर्ष झाला होता.त्यावेळी पहिल्यांदा प्रचार कार्यालय जाळणं, एकमेकांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर हल्ला चढवणं. महापालिकेत महापौरांच्या दालनात धिंगाणा घालणं असं सारं काही रवी राणा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलं होतं. राणांचा धसका घेऊन खोडक्यांनी चक्क बडनेरा मतदारसंघालाच हात जोडले आणि 2019 ची निवडणूक सुलभा खोडके या काँग्रेसच्या उमेदवार म्हणून अमरावती विधानसभा मतदारसंघातून लढल्या आणि विजयी झाल्या. 2019 च्या निवडणुकीत राणा यांच्या कट्टर विरोधक असणाऱ्या सुलभा खोडके या बडनेरा विधानसभा मतदार संघात नव्हत्या, अशावेळी शिवसेनेचे माजी आमदार दिवंगत संजय बंड यांच्या पत्नी प्रीती बंड या भाजपा आणि शिवसेना युतीच्या उमेदवार म्हणून राणांविरुद्ध उभ्या ठाकल्या. रवी राणा यांनी प्रीती बंड यांचा 15 हजार 541 मतांनी पराभव करून सलग तिसऱ्यांदा बडनेरा मतदारसंघात आपलं नेतृत्व कायम राखलं.

राणांच्या विजयामागचं गणित :रवी राणा यांनी 2009 मध्ये पहिली विधानसभा निवडणूक लढवली. तेव्हा ते 24, 25 वर्षांचे होते. बडनेरा विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या प्रत्येक घरात भेट देणारा एकमेव उमेदवार, अशी ओळख रवी राणा यांनी निर्माण केली. बडनेरा विधानसभा मतदारसंघात राणा यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणला. आमदार झाल्यानंतर रवी राणा यांनी सलग पाच वर्षे मतदारसंघात खळबळ उडवून दिली. मतदारसंघात प्रत्येक दिवाळीला आमदार रवी राणा यांनी दिवाळीला किराणा सामान प्रत्येकाच्या घरी पोहोचवण्याचा अभिनव उपक्रम राबवला. त्यांनी विदर्भ दहीहंडी नावानं राजापेठ चौकात भव्य दहीहंडी स्पर्धा सुरू केली. दरवर्षी प्रसिद्ध चित्रपट कलाकार या दहीहंडीला उपस्थित असतात. विशेष म्हणजे अमरावती शहरातील सायन्स कोअर मैदानावर झालेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात त्यांनी नवनीत राणा यांच्याशी विवाह केला. बडनेरा विधानसभा मतदारसंघात सर्वच जाती धर्माच्या लोकांशी रवी राणांची जवळीक आहे. 45 ते 50 हजारापर्यंत दलित मतदार बडनेरा मतदार संघात असून यापैकी अनेक मतदार हे रवी राणांशी आतापर्यंत तरी चांगले जुळले आहेत. विशेष म्हणजे कितीही संकटं आली, तरी शांत राहून निर्णय घेण्याची वृत्ती हा रवी राणा यांचा सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे.

नवनीत राणांनी तयारी केली तर रवी राणांचं नुकसान : अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यादेखील अनुसूचित जातीसाठी राखीव असणारा दर्यापूर मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं बोललं जातंय. नवनीत राणा या कुठल्याही मतदारसंघातून उमेदवार म्हणून निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या तर याचा फटका निश्चितच बडनेरा मतदारसंघात आमदार रवी राणा यांना बसेल. कारण एकाच घरात खासदार आणि आमदार मतदारांनी नाकारलेत. रवी राणा यांची बाजू बडनेरा विधानसभा मतदारसंघात काहीशी मजबूत दिसत असताना नवनीत राणा यादेखील दर्यापूर किंवा राज्यातील कुठल्याही मतदारसंघातून उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या तर दोन ठिकाणी शक्तीपणास लावताना बडनेरात आमदार रवी राणा यांना निश्चितच फटका बसू शकतो.

आता राणांविरुद्ध कोण? :नवनीत राणा या अमरावती जिल्ह्याच्या खासदार झाल्यापासून राणा दांपत्य हे केवळ नेत्यांनाच नव्हे, तर जनतेसाठी देखील मोठी डोकेदुखी ठरली होती. यामुळंच नवनीत राणा यांचा पराभव झाला असं बोललं जातं. नवनीत राणा यांच्या पराभवानंतर आता राणांची घरी बसवण्याची वेळ आलीय, असं भाजपा, शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला वाटतं होतं. शिवसेनेनं बडनेरा विधानसभा मतदारसंघात सलग तीन वेळा यापूर्वी विजय मिळवला होता. त्यामुळं बडनेरामध्ये शिवसेनेचा भगवा फडकवा असं साऱ्याच शिवसैनिकांना वाटतं होतं. असं असलं तरी विजयाचा हा भगवा नेमका कोणाच्या हातात असावा, शिवसेनेचा उमेदवार कोण असावा याबाबत प्रश्नचिन्ह होतं. गेल्या वेळी प्रीती बंड या भाजप आणि शिवसेना युतीच्या उमेदवार होत्या. माजी आमदाराच्या पत्नी म्हणून त्यांना उमेदवारी मिळाल्यामुळं शिवसेनेतील अनेकांनी नाकं मुरडली होती. दरम्यान, आता महायुतीचा उमेदवार मीच असं प्रीती बंड यांच्यासह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे, अमरावतीचे माजी खासदार अनंत गुढे यांच्यासह आणखी एक दोन कार्यकर्त्यांना वाटतं. भाजपामध्ये तर राणांना पराभूत करणं हे आमचं केवळ निवडणुकीपुरताच नव्हे तर आयुष्याचे ध्येय असं तुषार भारतीय यांना वाटतंय. काहीही झालं तरी राणांचा पराभव करायचाच आणि तो आपण करणारच, असा ठाम विश्वास तुषार भारतीय यांच्यात दिसतोय. मात्र खरंच राणा यांना नेमकं कोण पराभूत करू शकतं हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाहीत.

महायुतीचा उमेदवार असल्याचा प्रचार :विरोधक अगदी पूर्ण ताकदीनिशी समोर उभे ठाकले असतानाही रवी राणा मात्र आजही शांत आहेत. शिवसेनेचे स्थानिक नेते पदाधिकारी कोण किती पाण्यात याचा अंदाज रवी राणा जाणून आहेत. तुषार भारतीय हे अगदी तळमळीने भाजपाची उमेदवारी आपल्याला मिळेलच या आशेने जोरदार तयारीला लागले असले आणि सर्वसामान्य जनतेतून चांगला पाठिंबा त्यांना मिळताना दिसत असला तरी आपल्या सोबत असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर भाजपातील स्थानिक एकही नेता काहीही बोलू शकणार नाही हे रवी राणा जाणून आहेत. ही अशी संपूर्ण परिस्थिती पाहता राणांविरुद्ध खरंच नेमकं कोण हा प्रश्न निवडणुक जाहीर झाली असताना देखील कायम आहेच, आणि हो रवी राणा यांनी आपण महायुतीचे उमेदवार आहोत, असं जाहीर करून सोशल मीडियावर तसा प्रचार देखील सुरू केला.

बडनेरा मतदारसंघाचे आतापर्यंतचे आमदार

  • 1962 पुरुषोत्तम देशमुख काँग्रेस
  • 1967 कृष्णराव शृंगारे रिपाइं
  • 1972 पुरुषोत्तम देशमुख काँग्रेस
  • 1978 मंगलदास यादव काँग्रेस
  • 1980 राम मेघे काँग्रेस
  • 1985 राम मेघे काँग्रेस
  • 1990 प्रदीप वडनेरे शिवसेना
  • 1995 ज्ञानेश्वर धाने शिवसेना
  • 1999 ज्ञानेश्‍वर धाने शिवसेना
  • 2004 सुलभा खोडके राष्ट्रवादी काँग्रेस
  • 2009 रवी राणा अपक्ष
  • 2014 रवी राणा अपक्ष
  • 2019 रवी राणा अपक्ष

2019 चा निकाल

  • रवी राणा -अपक्ष, 90,460 मतं
  • प्रीती बंड - शिवसेना 74, 919 मतं

2014 चा निकाल

  • रवी राणा - अपक्ष,46,827 मतं
  • संजय बंड - शिवसेना, 39, 408 मतं
  • सुलभा खोडके - काँग्रेस,33,897 मतं
  • तुषार भारतीय - भाजपा,31,445 मतं

अशी आहे मतदार संख्या

  • पुरुष : 1 लाख 78,508
  • महिला :1 लाख 74,496
  • इतर : 43
  • एकूण :3 लाख 53,047

हेही वाचा

  1. मनोज जरांगे पाटील विधानसभेला उमेदवार देणार की पाडणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
  2. भाजपाची पहिली यादी जाहीर; पुण्यातील 'या' मतदारसंघातील पेच अजूनही कायम
  3. मुरलीधर मोहोळांनी गाठलं 'शिवतीर्थ'; पुण्यासाठी ठरवला प्लॅन? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Last Updated : 6 hours ago

ABOUT THE AUTHOR

...view details