नाशिक :देवळाली मतदारसंघात सुचवलेली आवश्यक कामं न झाल्याचा ठपका ठेवत माजी मंत्री बबनराव घोलप यांनी शिवसेनेला रामराम करत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. आज (27 ऑक्टोबर) मातोश्री येथं उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.
सहा महिन्यांपूर्वी ठाकरेंची सोडली होती साथ :देवळाली मतदारसंघाचे 5 वेळा आमदार असलेले आणि माजी मंत्री बबनराव घोलप यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा राजीनामा दिला होता. सहा महिन्यांपूर्वी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, त्यांचे पुत्र माजी आमदार योगेश घोलप हे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच होते.
मतदारसंघातील कामं न केल्यानं राजीनामा :देवळालीची जागा मिळवण्यासाठी योगेश घोलप यांनी मोठी पराकष्ठा केली होती. देवळाली मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सुटणार, असं वाटतं असल्यामुळं योगेश घोलप यांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याची तयारी होती. मात्र, देवळालीची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटली आणि योगेश घोलप यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर आज माजी मंत्री बबनराव घोलप यांनी चर्मकार समाजाची कामं व देवळाली मतदारसंघात आवश्यक सांगितलेली कामं न केल्यानं शिवसेना पक्षाचा राजीनामा देत असल्याचं सांगितलं. मुंबईत मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बबनराव घोलप यांनी प्रवेश केला. यावेळी माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह संपर्कप्रमुख दत्ता गायकवाड उपस्थित होते.
माझ्यावर फार मोठे उपकार केले : "6 एप्रिल रोजी मी आपल्या शिवसेना पक्षात प्रवेश केला होता, त्यात माझ्या समाजाच्या काही मागण्या आणि मतदार संघात काम करण्याचं मान्य केलं होतं. पण त्यापैकी एकही मागणी मान्य झाली नाही, त्यामुळं समाज नाराज झाला. आता माझा मुलगा योगेश घोलप याला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं उमेदवारी देत फार मोठे उपकार केले. म्हणून आपल्या शिवसेना पक्षाचा राजीनामा देत आहे," असं माजी मंत्री बबनराव घोलप यांनी म्हटलं.
देवळाली हा शिवसेनेचा बालेकिल्ला :माजी आमदार योगेश घोलप यांना देवळाली मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. देवळाली मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. योगेश घोलप यांना उमेदवारी मिळाल्यानंतर हा गड आमच्याकडे राहील, असं शिवसेना वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अजीम सय्यद यांनी सांगितलं.
माजी मंत्री बबनराव घोलप यांची कारकीर्द :शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बबन घोलप हे देवळाली विधानसभा मतदार संघातुन तब्बल 5 वेळा विधानसभेवर गेले तर राज्याचे समाजकल्याण मंत्री म्हणून त्यांनी काम केलंय. त्यांची कन्या नयन घोलप- वालझाडे यांना शिवसेनेनं नाशिकच्या महापौरपदी विराजमान केलं होतं. तर मुलगा योगेश घोलप यांना पुन्हा एकदा विधानसभेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी ठाकरेंच्या शिवसेनेनं यांनी दिलीय.
हेही वाचा
- अर्ध्या तासात गुंड जमा, सुजय विखेंवरील प्राणघातक हल्लाचा मास्टमाईंड कोण? राधाकृष्ण विखे पाटलांचा सवाल
- EXCLUSIVE : पालघरमधून राजेंद्र गावित यांची उमेदवारी निश्चित, सहा महिन्यांतच पुन्हा घरवापसी
- राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी जाहीर; 'या' अभिनेत्रीच्या पतीला उमेदवारी