पुणे : विधानसभा निवडणुकीला सुरुवात झाली असून आता प्रचाराला देखील वेग आला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाला सुरवात झाली आहे. अश्यातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका करत आमचं सरकार हे हप्ते भरणार सरकार असून आम्ही हप्ते घेणारे नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
महाविकास आघाडीवर टीका : शिवाजीनगर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारार्थ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.
शंभर वेळा जेलमध्ये जायला तयार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भात विरोधक कोर्टात गेले. कोर्टानं त्यांना चांगली चपराक दिली. परत ते नागपूरच्या कोर्टात गेले. ही योजना बंद पडावी, बदनाम व्हावी म्हणून विरोधकांकडून प्रयत्न करण्यात आले. पण त्यांना यश आलं नाही. माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ आणि लाडक्या शेतकऱ्यांना योजना देत असताना जर जेलमध्ये जायची पाळी आली, तर एकनाथ शिंदे एकदा नाही तर शंभर वेळा जेलमध्ये जायला तयार आहे."