मुंबई : "मनसे महाराष्ट्राच्या भुमीपुत्रांसाठी लढते, असं आम्हाला वाटायचं. मात्र, प्रत्यक्षात मनसे गुजरातच्या भुमीपुत्रांसाठी लढते," असा टोला शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंना लगावला. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवणाऱ्या मोदी सरकारला मनसेनं पाठिंबा दिल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. महाराष्ट्राचं राजकारण गलिच्छ, गढूळ व घाणेरडं केलं, त्याच भाजपाला मनसेनं पाठिंबा दिल्याची टीकाही त्यांनी केली.
समाजात वाद लावणं, भाजपाचा शेवटचा पर्याय : "ज्याप्रमाणे धर्मांतर विरोधी कायद्यावर भाजपा बोलत आहे, त्याप्रमाणे त्यांनी पक्षांतर विरोधी कायद्यावर बोलावं व त्याप्रमाणे कृती करावी. समाजात वाद लावणं, हा भाजपाचा शेवटचा पर्याय असतो. राज्यातील शेतकरी, महिला वर्ग, तरुण वर्ग यांच्या समस्यांवर देखील भाजपानं बोलण्याची गरज आहे. मात्र, ते सातत्यानं केवळ दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्यं करत राहतील," असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.
महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये : "बांगलादेशी नागरिकांची संख्या वाढत असल्याची टीका भाजपानं केली आहे, या टीकेतून त्यांनी देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असलेल्या जवानांवर अविश्वास दर्शवला. 2014 पासून गेली 10 वर्षे भाजपा केंद्रात सत्तेवर आहे. मग ही परिस्थिती का निर्माण झाली? याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे," असं आदित्य ठाकरे म्हणाले. भाजपानं महाराष्ट्रातील जे उद्योग गुजरातमध्ये पळवले, त्यावर बोलण्याची गरज आहे. राज्यातील तब्बल पाच लाख रोजगार गुजरातमध्ये गेले. भाजपा महाराष्ट्रद्वेष्टा असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला.