मुंबई: महाविकास आघाडीमधील (Maha Vikas Aghadi) कॉंग्रेस, शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार या तीनही पक्षांनी प्रत्येकी 85 जागांवर लढण्यास सहमती दर्शवली आहे. आघाडीतील इतर सर्व पक्ष समाजवादी पक्ष, शेकाप, कम्युनिस्ट या पक्षांसाठी इतर जागा सोडण्यात येतील अशी माहिती, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत या नेत्यांची बैठक झाल्यानंतर त्याची माहिती राऊत यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते.
महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक :संजय राऊत म्हणाले, "शरद पवारांसोबत आमची बैठक पार पडली. महाविकास आघाडीचं जागावाटप सुरळीत सुरू आहे. पवारांनी बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती देण्यास सांगितलं असं त्यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेच्या यादीत काही प्रशासकीय चूक झाली ती कशी झाली हे आम्ही पाहू आणि उद्या पुन्हा सर्व पक्ष नेते एकत्र बसून निर्णय घेऊ. शिवसेनेच्या यादीत काही जागांवर सुधारणा करण्यात येईल. गुरुवारी पुन्हा महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार असून त्यानंतर पुढील निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. शिवसेनेच्या यादीत काही जागा शेकापशी संबंधित जागा आहेत. त्याबाबत शेकापासोबत चर्चा सुरू आहे. काही जागा राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसशी संबंधित आहेत त्यांच्याशी चर्चा करण्यात येईल".