मुंबई Vijay Wadettiwar : राज्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला असून निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य धुवून काढण्याचं काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कार्यालय पाठीशी असलेल्या गृहनिर्माण विभागानं एका विकासकाला 400 कोटी रुपये दिल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. तर पावसामुळं बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे पंचनामे करावेत आणि तत्काळ मदत द्यावी तसंच बार्टीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी, अशा विविध विषयांवर त्यांनी सरकारवर जोरदार प्रहार केला.
विजय वडेट्टीवार (ETV Bharat Reporter) सरकारचा अनागोंदी कारभार सुरू : यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, "राज्यात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला असून त्यात राज्य बुडालं आहे. सरकारमधील या तीनही पक्षांच्या प्रमुखावर धाक राहिला नाही. त्यामुळं सर्व अनागोंदी कारभार सुरू आहे. गृहनिर्माण विभागाकडून विकासकाला 400 कोटी रुपये दिले जात आहेत. कंत्राटदाराला नियमबाह्य पैसे दिले जात आहेत." तसंच ते पुढे म्हणाले, "... विकासक सहा महिने सीबीआयच्या कस्टडीत होता. याच सरकारनं कारवाई केली होती. मग 127 कोटी रुपये देऊनही त्यानं एकही सदनिका दिलेली नसताना त्याला 400 कोटी रुपये का दिले जात आहेत? तो पळून जाईल अशी व्यवस्था करण्यात येत आहे का? या विकासकानं एकही रुपया लावला नाही. हा बाहेरुन आलेला विकासक असून मुख्यमंत्री कार्यालय त्याला पाठीशी घालत असून मुख्यमंत्र्यांना माझा प्रश्न आहे, याला तुमचा पाठींबा आहे का? अनुभव नसताना तुम्ही त्याला एवढी मोठी रक्कम देत आहात. एकीकडे राज्यातील कंत्राटदार यांना पैसे देत नाही, त्यामुळं रस्त्यावरील खड्डे बुजवले जात नाही." तात्काळ यावर कारवाई केली पाहिजे, असंही वडेट्टीवार म्हणाले.
बार्टीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्या : सरकारला कुबुद्धी आहे की सुबुद्धी असा प्रश्न निर्माण होतो. कारण हे सरकार जिथं कमिशन मिळत नाही तिथं उदासीन असतं. कमिशनसाठी सरकार 1 पाऊल पुढं आहे. बार्टी, सारथी, महाज्योतीच्या ज्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं ते विद्यार्थी पायी आले. कारण त्यांना सरकार शिष्यवृत्ती देत नाही. आपण मंत्री असताना 1185 विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली होती. आज बिल्डरसाठी तिजोरी खुली आहे, पण विद्यार्थ्यांसाठी नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. मुख्यमंत्र्यांना सर्व सामान्यासाठी वेळ नाही, अधिकाऱ्यांना घेऊन भ्रष्टाचार करत आहे. मागासवर्गीयांसाठी अनास्था आहे. तर दुसरीकडे खाजगीसाठी सर्व करायचं अशी परिस्थिती आहे. हे सरकार कोणासाठी चालू आहे हा प्रश्न आहे, असा सवाल करीत जनता तुम्हाला खड्ड्यात गाडेल, निवडणुकाची घोषणा झाली की जनता तुम्हाला मातीत गाडल्या शिवाय राहणार नाही, असंही विजय वड्डेटीवार म्हणाले.
पंचनामे करुन तत्काळ मदत द्या : राज्यात सर्वत्र पाऊस वाढला आहे. धरणाचे दरवाजे उघडले आहेत. म्हणून शेत जमिनी पाण्याखाली गेली आहे. तलाव फुटल्यामुळं शेतीचं नुकसान झालं असून तातडीनं पंचनामे करावे, अशी मागणीही विजय वडेट्टीवार यांनी केली. तसंच वडसा तालुक्यातील एक गाव आहे, त्याचं पुनर्वसन झालं नाही. अतिवृष्टीच्या संकटाबाबत सरकारनं तातडीनं मदत करायला हवी, उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदत करावी. चिंताग्रस्त शेतकरी सरकारकडं लक्ष लावून बसल्याचं वडेट्टीवार म्हणाले.
शरद पवार दूरदृष्टी असलेला नेता : शरद पवारांचं व्हिजन विकासाचं आहे. जसं विलासराव देशमुखांचं होतं त्यातलं एक नाव म्हणजे शरद पवारांचं आहे. विकासाच्या बाबतीत गेले असतील, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा असेल तर त्यांनी चर्चा करायला काय हरकत आहे. वाट लावली या सरकारनं आणि बोट दाखवलं आमच्याकडे असं विजय वडेट्टीवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवारांच्या भेटीवर म्हटलंय.
हेही वाचा :
- विशाळगड घटनेचा मास्टरमाईंड सरकारने शोधावा- विजय वडेट्टीवार - Vijay Wadettiwar
- विधानपरिषद निवडणूक 2024 : काँग्रेसची मतं फुटणार ही फक्त अफवा ; विजय वडेट्टीवार यांचा दावा - Maharashtra MLC Election 2024