बीड Pankaja Munde on Beed Loksabha : भाजपा नेत्या पंकजा मुंडे या बीड लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सध्या सुरूय. यावर आता पंकजा मुंडेंनीच प्रतिक्रिया दिलीय. बीडची लोकसभा निवडणूक नेमकी कोण लढवणार हे पक्षातले वरिष्ठ लोक ठरवतील, असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय. आष्टी इथं पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची संवाद बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर पंकजा मुंडे बोलत होत्या.
उमेदवार कोण हे येणाऱ्या काळात निश्चित होईल : आष्टी इथं झालेल्या कार्यक्रमानंतर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, "लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सध्या बूथ रचना केली जात आहे. या कामाला कार्यकर्त्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. 2014 आणि 2019 मध्ये याच कार्यकर्त्यांनी माझ्या बाजूनं चांगलं काम केलं होतं, त्यामुळं उमेदवार कोण असेल हे येणाऱ्या काळात निश्चित होईल."
कोणत्याही आरक्षणाच्या आंदोलनाचा निवडणुकांवर परिणाम होणार नाही :"राज्यात सध्या मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न पेटलाय. याचा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर पाहिजे तेवढ्या प्रमाणात धोकादायक परिणाम होणार नाही," असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय. राज्य सरकारनं मराठा समाजाला जे आरक्षण दिलंय, त्या आरक्षणाचा मराठा समाजानं विरोध केलाय. यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, "मराठा समाजानं ठरवावं ते आरक्षण हवं आहे की नाही, यावर अनेकदा मी माझी भूमिका स्पष्ट केलीय."
येणारा काळ महिलांचा आहे : "राजकारणात येणाऱ्या महिलांसाठी येणारा काळ चांगला आहे. येत्या काळात महिलाच या स्पष्ट आणि सत्याचं राजकारण करतील," असं पंकजा मुंडे म्हणाल्या. "तसंच येणाऱ्या काळात एकट्याची ताकद जगाला दाखवून द्यावी लागेल," असा इशाराही पंकजा मुंडेंनी भाजपाच्या स्थानिक आणि वरिष्ठ नेत्यांना दिलाय.
हेही वाचा :
- भाजपाकडून अशोकराव चव्हाण यांची राज्यसभेवर लागणार का वर्णी? भाजपा इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली
- "माझ्याबरोबर दगाफटका झाला, प्रत्येक निवडणुकीपूर्वी माझं नाव चर्चेत येतं", पंकजा मुंडे असं का म्हणाल्या?
- पंकजा मुंडेंनी जुन्या आठवणी सांगितल्यानं उदयनराजे भोसले झाले भावूक