महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

पहिल्या टप्प्यात राज्यात नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह 97 उमेदवार आजमावणार नशीब - Lok Sabha Elections - LOK SABHA ELECTIONS

Lok Sabha Elections : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शनिवारी संपली. यानंतर राज्यातील पाच मतदारसंघातील उमेदवारांचं चित्र स्पष्ट झालंय.

पहिल्या टप्प्यात राज्यात नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह 97 उमेदवार आजमावणार नशीब
पहिल्या टप्प्यात राज्यात नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह 97 उमेदवार आजमावणार नशीब

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 31, 2024, 9:01 AM IST

Updated : Mar 31, 2024, 9:11 AM IST

एस चौकलिंगम मुख्य निवडणूक अधिकारी

मुंबई Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शनिवारी दुपारी तीन वाजता संपली. पहिल्या टप्प्यात राज्यातील 5 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. या 5 जागांसाठी 97 उमेदवार रिंगणात राहिल्याचं स्पष्ट झालंय. यात केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे.

5 मतदारसंघात 97 उमेदवार रिंगणात : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील नागपूर, चंद्रपूर, रामटेक, गडचिरोली-चिमुर आणि भंडारा-गोंदिया या लोकसभेच्या 5 मतदारसंघांमध्ये 19 एप्रिलला मतदान होणार आहे. त्या मतदारसंघांमध्ये अर्ज दाखल केलेल्या 13 उमेदवारांनी अखेरच्या दिवशी आपले अर्ज मागे घेतले. यानंतर आता नागपूरमध्ये 26, चंद्रपूरमध्ये 15, रामटेकमध्ये 28, भंडारा-गोंदियामध्ये 18, तर गडचिरोलीत 10 उमेदवार लोकसभेत आपलं नशीब आजमावतील. पहिल्या टप्प्यात मतदानाला सामोरे जाणारे सर्व मतदारसंघ हे विदर्भातील आहेत.

भाजपा आणि कॉंग्रेसमध्ये लढत : रामटेक वगळता इतर चारही मतदारसंघांमध्ये भाजपा आणि कॉंग्रेस या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये थेट लढत होणे अपेक्षित आहे. तर रामटेकमध्ये कॉंग्रेसचे श्‍याम बर्वे आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे राजू पारवे आमनेसामने आहेत. नागपूरमध्ये गडकरी यांच्या विरोधात कॉंग्रेसनं आमदार विकास ठाकरे यांना उमेदवारी दिलीय. चंद्रपूरमध्ये मुनगंटीवार विरुद्ध कॉंग्रेसच्या प्रतिभा धानोरकर असा सामना होईल. गडचिरोलीत भाजपाचे विद्यमान खासदार अशोक नेते विरुद्ध कॉंग्रेसचे नामदेव किरसान आणि भंडारा-गोंदियात भाजपाचे खासदार सुनील मेंढे विरुद्ध कॉंग्रेसचे प्रशांत पडोळे अशा लढती रंगतील.

राज्यात पाच टप्प्यात मतदान :महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार आहेत. राज्यासाठी ही लोकसभा निवडणूक विशेष असणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात बंड झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक असणार आहे. त्यामुळं कोणता पक्ष किती जागा जिंकतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यांत 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे रोजी मतदान होणार आहे.

मतदारांना मिळणार सुविधा : लोकसभा निवडणुकीत मतदारांना विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असून याअंतर्गत अंध मतदारांच्या सुलभतेसाठी त्यांना ब्रेल लिपीमधील मतदार माहिती चिठ्ठी उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस चोक्कलिंगम यांनी शनिवारी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. राज्यातील पहिला टप्प्यातील मतदाना संदर्भातील सर्व तयारी पूर्ण झाली असून अंध आणि दिव्यांग मतदारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा :

  1. Lok Sabha Elections : महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये मतदान; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
  2. नितीन गडकरींनी नागपूर लोकसभेसाठी महायुतीकडून भरला उमेदवारी अर्ज, 5 लाखांनी विजयी होण्याचा गडकरींना विश्वास - Nitin Gadkari filed nomination
Last Updated : Mar 31, 2024, 9:11 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details