मुंबई Lok Sabha Elections 2024 :आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जागावाटपाबरोबरच प्रचाराची रणनीती आखण्यास सुरुवात केलीय. या प्रचाराच्या रणधुमाळी मध्ये दिग्गज नेते रणांगणात उतरणार आहेत. विशेष म्हणजे या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रातील आठ आजी-माजी मुख्यमंत्री प्रचाराच्या केंद्रस्थानी असतील. एखाद्या राज्यात एवढ्या मोठ्या संख्येनं आजी-माजी मुख्यमंत्री प्रचारात उतरण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल.
शरद पवार :राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे नेते शरदचंद्र पवार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री शरद पवार वयाच्या 85व्या वर्षीही प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहेत. शरद पवार 50 वर्षांहून अधिक काळ संसदीय राजकारणात आहेत. 1978 मध्ये ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यांनी तीन वेळा राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलंय. त्यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. परंतु 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी उर्वरित आमदारांसह लोकसभा निवडणुकीला सामोरे गेले आणि दहापैकी आठ उमेदवार जिंकून आपली ताकद सिद्ध केली. ते आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मुख्य भूमिकेत दिसतील.
एकनाथ शिंदे : शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. शिंदे यांनी महाराष्ट्रात मुख्यमंत्री 'माझी लाडकी बहीण योजना' राबवून प्रचाराची सूत्रं आपल्या हातात घेतली. या योजनेचा आणि गेल्या अडीच वर्षात केलेल्या विकास कामांचा प्रचार मुख्यमंत्री जोरदारपणे करत आहेत. महायुतीतल्या अंतर्गत वादांचा सामना करत मुख्यमंत्र्यांना प्रचारात बाजी मारावी लागणार आहे, अशी प्रतिक्रिया जेष्ठ राजकीय विश्लेषक उदय तानपाठक यांनी व्यक्त केली.
उद्धव ठाकरे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 2019 ते 2022 या काळात अडीच वर्षे मुख्यमंत्री होते. त्यांच्याच पक्षातील अंतिम मंत्रिमंडळातील सदस्य एकनाथ शिंदे यांनी पक्षातून बाहेर पडून भाजपासोबत सत्ता स्थापन केली. हा घाव जिव्हारी लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र पिंजून काढला आणि लोकसभा निवडणुकीत महायुतीला चांगलीच टक्कर दिली. आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली असून या निवडणुकीत कोणत्या मुद्द्यांवर ते सत्ताधाऱ्यांना अडचणी आणतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
देवेंद्र फडणवीस : महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत प्रभावी आणि अभ्यासू नेते तसेच भारतीय जनता पार्टीचे 'चाणक्य' म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जातं. 2014 ते 2019 या काळात देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्यासोबत पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मात्र, ते सरकार टिकलं नाही. आता पुन्हा एकदा राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे रणनीती आखत आहेत. या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस प्रचाराच्या रिंगणात काय करिष्मा करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.