सातारा Lok Sabha Election 2024 : सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खा. उदयनराजे भोसले(Udayanraje Bhosale) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विराट शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. जलमंदिर पॅलेस येथून बैलगाडीतून येवून ते महारॅलीत सहभागी झाले. बैलगाडीचा कासरा खा. उदयनराजे आणि आ. शिवेंद्रराजेंच्या हाती होता. दरम्यान, अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना 'घोटाळे दाबण्याचा हाच का यशवंत विचार', असा उपरोधिक सवाल उदयनराजेंनी शरद पवारांना केला.
महारॅलीत मुख्यमंत्र्यांसह 'या' दिग्गजांची उपस्थिती : खा. उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यासह पालकमंत्री शंभूराज देसाई, माजी मंत्री सदाभाऊ खोत, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. मकरंद पाटील, आ. जयकुमार गोरे, आ. महेश शिंदे, माथाडी नेते आ. नरेंद्र पाटील, माजी आ. मदन भोसले, दमयंतीराजे भोसले उपस्थित होत्या. गांधी मैदानपासून महायुतीच्या रॅलीला सुरुवात झाली. मोती चौक, देवी चौकमार्गे शेटे चौकातून रॅली पोलीस मुख्यालयमार्गे पोवई नाक्यावर आली. यावेळी प्रमुख नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, दिवंगत यशवंतराव चव्हाण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केलं. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उदयनराजेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला. साताराच्या विकासाच्या मुद्यावर भूमिका मांडून उदयनराजेंना मताधिक्क्यानं विजयी करण्याचं आवाहन यावेळी प्रमुख नेत्यांनी केलं.
घोटाळे दाबणाऱ्यांचा हा कसला यशवंत विचार : उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना खासदार उदयनराजे भोसले यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यासह शरद पवार यांच्यावर खरपूस टीका केली. ते म्हणाले की, ज्यांनी घोटाळे केलेत, त्यांना माझ्या विरोधात लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. यशवंत विचारांचा वारसा सांगणाऱ्यांनी या उमेदवारासाठी जिल्ह्यात चार सभा घेतल्या. घोटाळे दाबण्याचा हाच का यशवंत विचार?, असा खोचक सवाल खासदार उदयनराजेंनी शरद पवारांना केला.