कोल्हापूर Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक एकूण सात टप्प्यात पार पडणार असून त्यातील दोन टप्प्यातील मतदान पार पडलंय. तर आता 7 मे रोजी तिसऱ्या टप्पातील मतदान पार पडणार आहे. तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील बारामती, हातकणंगले, कोल्हापूर, लातूर, माढा, उस्मानाबाद, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, सोलापूर या मतदारसंघात मतदान होणार आहे. तर आज (5 मे) तिसऱ्या टप्प्यातील मतदारसंघात प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर आज अनेक ठिकाणी उमेदवारांकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. तसंच आज सायंकाळी पाच वाजता या प्रचार तोफा थंडावणार आहेत.
कोल्हापुरात प्रचाराचा 'सुपरसंडे' :संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात महिन्यापासून चुरशीनं सुरू असलेल्या प्रचाराचा आज शेवट होणार आहे. आज रविवार असल्यानं जिल्ह्यात प्रचाराचा 'सुपरसंडे' पाहायला मिळणार आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी कोल्हापुरात तर धैर्यशील माने यांच्यासाठी इचलकरंजीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. महाविकास आघाडीकडून कोल्हापूरात घरोघरी जात प्रचारफेरी काढण्यात येणार आहे. यामध्ये आमदार सतेज पाटील, ऋतुराज पाटील, जयश्री जाधव, माजी खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी सहभागी होणार आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात बहुरंगी लढत होत असल्यानं या लढतीकडं सर्वांचंच लक्ष लागलयच. महायुतीकडून धैर्यशील माने, मविआकडून सत्यजित पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह वंचित बहुजनचे डीसी पाटील हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.