बीड Pankaja Munde News : बीड लोकसभा मतदारसंघामधून भाजपानं विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून पंकजा मुंडे यांना उमेवारी दिली. त्यामुळं प्रीतम मुंडे यांचं काय? त्यांना भाजपाकडून दुसरी कोणती जबाबदारी देण्यात येणार का? असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत होते. असं असतानाच पंकजा मुंडे यांनी बीडच्या सभेत प्रीतम मुंडे यांच्याबाबत सूचक विधान केलं. मी प्रीतम मुंडेला नाशिकमधून उभी करेन, असं त्या म्हणाल्या. त्यानंतर त्यांच्या विधानामागे अनेक तर्क-वितर्क काढण्यात येऊ लागले.
पंकजा मुंडेंनी मारली पलटी : आपल्या वक्तव्याविषयी माध्यमांशी संवाद साधत असताना पंकजा म्हणाल्या की, "समज होणाऱ्या लोकांच्या ना समजपणाचं हे लक्षण आहे. असं काही नाही. एखादा विषय सहज बोलला, लाईटली बोलला. प्रीतम ताईंचे सासर तिकडे आहे. तिकडून स्वागत देखील झालं, याबाबत मी अगदी सहज बोलले होते. परंतु, त्याचे वेगवेगळे अर्थ काढले गेले लोकसभा, विधानसभेविषयी तर मी बोललेच नव्हते", असं मुंडे म्हणाल्या.
काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे? : “प्रीतम ताईंना विस्थापित करणार नाही, मी हा शब्द दिला होता. मला तिकीट देऊ नका, असं म्हणूनच मी सगळीकडं गेले होते. परंतु, मला हे आता लक्षात आलंय की, ही निवडणूक कशाची आहे. प्रीतम मुंडे कुठंही अडणार नाही. त्यांना मी नाशिकमधून उभं करेन, तुम्ही काळजी करू नका. ताईचं राजकारण हे गोपीनाथ मुंडे साहेबांच्या पाश्चात होतं. पण मी मुंडे साहेब असताना त्यांचा हात बनले होते”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आल्याचं बघायला मिळालं.