छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Constituency : उमेदवारी अर्ज भरण्यावरून शहरात चांगली चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे धार्मिक असल्याची ख्याती सर्वांनाच आहे. त्यानुसार त्यांनी 22 एप्रिल हा मुहूर्त अर्ज भरण्यासाठी काढला होता आणि तसा त्यांनी अर्ज भरला देखील. मात्र, महायुतीचे उमेदवार आणि शिंदे गटाचे नेते संदीपान भुमरे यांनी 25 एप्रिल ही तारीख उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाहीर केली असताना अचानक, त्यांनी देखील सोमवारीच अर्ज भरला आहे. त्यामुळं विविध चर्चांना सुरुवात झाली आहे.
खैरे यांनी भरला उमेदवारी अर्ज : ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे हे कुठलंही शुभ काम करण्यापूर्वी देवाचं दर्शन घेऊन आणि मुहूर्त पाहूनच त्या कामाची सुरुवात करतात. लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच, त्यांनी सवयीप्रमाणे पूजापाठ करून प्रचार कार्यालय सुरू केले. त्यादिवशी स्थानिक नेते शहरात नसताना त्यांनी त्यांची नाराजी ओढवून घेत मुहूर्त गाठला आणि पुजन केले. तर त्याच दिवशी 22 एप्रिल रोजीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मुहूर्त त्यांनी काढला. 22 एप्रिल रोजी शक्तिप्रदर्शन करून आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी दुपारी बारा वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, त्याच्या काही वेळानेच अचानक शिंदे गटाचे उमेदवार आणि पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी कुठलेही नियोजन नसताना अर्ज भरल्यानं चर्चा रंगली आहे.
25 तारखेला भुमरे भरणार होते अर्ज: संदिपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, त्यांनी 25 एप्रिल रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार अशी घोषणा केली होती. त्याचबरोबर उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एकनाथ शिंदे सभा घेतील असं देखील सांगण्यात आलं होतं, आणि त्या अनुषंगानं सर्वत्र तयारी सुरू झाली होती. मात्र, सोमवारी दुपारी अचानकच त्यांनी कुठलाही गाजावाजा न करता किंवा कोणालाही कळू न देता आपला उमेदवारी अर्ज सादर केला.
विनोद पाटलांची भेट घेतल्यानंतर भरला अर्ज : मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी महायुती तर्फे उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांना ती नाकारण्यात आली आणि त्या ऐवजी पालकमंत्री संदिपान भुमरे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर सोमवारी विनोद पाटील यांनी अचानक मुंबई गाठून भाजपा नेत्यांची भेट घेतली. त्यामुळंच उमेदवारी बदल होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळं आपली उमेदवारी जाईल म्हणून अचानक भुमरे यांनी अर्ज केला का? असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.
हेही वाचा -
- आदित्य ठाकरे 'ईटीव्ही'शी संवाद साधणार अन् तेवढ्यात स्टेज कोसळलं; किरकोळ दुखापत - aaditya thackeray stage collapsed
- छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना 'सामना'; संदीपान भुमरेंना उमेदवारी - Lok Sabha Election 2024
- संभाजीनगरचा उमेदवार आजच जाहीर करण्याची संजय शिरसाठ यांची मुख्यमंत्र्यांकडं मागणी - Lok Sabha Election 2024