अमरावती Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीतल्या अंतिम टप्प्यातील मतदान आज पार पडलं. "एक्झिट पोल निकाल" (Exit Poll 2024 ) येण्यास सुरुवात झालीय. अशातच अमरावती लोकसभा काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे (Balwant Wankhade) यांनी 'ईटीव्ही भारतशी' विशेष बातचीत केलीय. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, मी मोठ्या मताधिक्यानं निवडून येणार आहे. अमरावती लोकसभेचा खासदार म्हणून निवडून आल्यास जिल्ह्यासाठी विकासाची कामे तीव्र गतीनं करणार आहे. शेतकरी आत्महत्या आणि कुपोषण या विषयावर प्राधान्याने काम करणार असल्याचं वानखडे यांनी सांगितलं.
शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचून करणार काम :लोकसभा निवडणूक ह्या साधारणतः राष्ट्रीय मुद्द्याला अनुसरून घडल्या जातात. परंतु स्थानिक प्रश्नही तेवढेच महत्त्वाचे असतात. त्यामुळं स्थानिक प्रश्नांमध्ये पिण्याचे पाणी, शेतीसाठी पाणी, वीज आणि रस्ते हे महत्वाचे प्रश्न आहेत. समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचून समस्या जाणून घेऊन त्यांच्यासाठी जे काही करता येईल ते प्रामाणिकपणे करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. देशपातळीवरील प्रश्नांप्रमाणेच स्थानिक प्रश्नही तेवढेच महत्त्वाचे असतात. स्थानिक प्रश्नांसाठीच लोकप्रतिनिधी असतो. त्यामुळं त्याकडं दुर्लक्ष करून चालत नाही.
महागाईने शेतकरी होरपळून निघाला: शेतकरी आत्महत्या जिल्ह्यासाठी भूषणावह नाही. शेतकरी आत्महत्या विषयी गांभीर्यानं बोलताना ते म्हणाले की, जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या होणं ही भूषणावह बाब नाही. त्याच समर्थन करणं योग्य नाही. परंतु मुळात शेतकरी जे काही पिकवतो तर सरकार शेतकऱ्याच्या कृषी मालाला योग्य भाव देत नाही, त्यामुळं शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्याच्याकडं उपजीविकेचे अन्य कुठलेही साधन नाही. जिल्ह्यात कोरडवाहू शेतीची संख्या जास्त आहे. त्यामुळं फक्त चार महिने त्याच्या हाताला काम असते आणि इतर वेळी तो रिकामा असतो. वाढत्या गरजा, बेरोजगारी, महागाईने शेतकरी अगदी होरपळून निघाला आहे.