कोल्हापूर : "पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतात. बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसतात, अशी घणाघाती टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी कोल्हापुरात केली. कोल्हापुरातील गांधी मैदानात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित महाराष्ट्र स्वाभिमान सभेत त्या शनिवारी बोलत होत्या.
काय म्हणाल्या प्रियंका गांधी? : प्रियंका गांधी म्हणाल्या, " कोल्हापूर ही स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या वीरांची भूमी आहे. या भूमीतील संतांनी समाजाला मानवतेचा आणि समानतेचा संदेश दिलाय. देशातील काही मोठे नेते भाषण करताना ऐकलं. हे नेते भाषणात सकारात्मक आणि खरं बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणे निराश करणारी आहेत. महाराष्ट्रात नेत्यांकडून या भूमीचा अपमान होतोय. छत्रपती शिवरायांचादेखील अपमान होतोय."
पुढे काँग्रेसच्या सरचिटणीस म्हणाल्या, "देशात दहा वर्षांपासून आणि राज्यात गेल्या अडीच वर्षांपासून महायुती सरकार आहे. इथल्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी काय केलं?", असा सवाल प्रियंका गांधींनी केला. "सत्ताधारी काहीही करत नाहीत. केवळ निवडणूक आली की धर्माच्या आधारावर मत मागण्याचं काम हे करत आहेत," असं टीकास्त्रही गांधी यांनी महायुतीवर सोडलं. "गेली दहा वर्ष केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींची सत्ता आहे. सत्ता काळात देशातील बड्या उद्योगपतींचे 16 लाख कोटींचं कर्ज माफ होतं. मात्र, मायबाप शेतकऱ्याला कर्जमाफी देताना सरकार पैसे नसल्याच सांगतं. केंद्रातील मोदी सरकार महाराष्ट्राला संधी मिळेल तिथं दुर्बल करते," असा आरोपही गांधी यांनी केला.