मुंबई PM Modi Campaign: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत अकरा सभा घ्याव्या लागल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्या टप्प्यापर्यंत महाराष्ट्रात 11 सभा घेत आहेत. त्यांच्या आणखी काही सभा महाराष्ट्रात पुढील दोन टप्प्यात होणार आहेत. म्हणजे त्यांना महाराष्ट्रात किमान 20 ते 25 सभा घ्याव्या लागणार आहेत. भाजपाचे देशातील प्रमुख नेतृत्व असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वतः महाराष्ट्रात सातत्यानं यावं लागत आहे. याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाहसुद्धा महाराष्ट्रात येत आहेत. त्यामुळं महाराष्ट्रावर या नेत्यांनी अधिक लक्ष दिलं आहे हे स्पष्ट होतं. नेमकी याची काय कारणं आहेत जाणून घेऊया राजकीय तज्ञांकडून.
पंतप्रधान मोदी यांच्या महाराष्ट्रातील सभा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात सभांचा धडाका लावला असून पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील चंद्रपूर, रामटेक, आणि वर्धा येथे त्यांनी सभा घेतल्या. तर दुसऱ्या टप्प्यात नांदेड, परभणीत सभा घेतल्या. तिसऱ्या टप्प्यात मोदी यांनी सोलापूर सातारा, पुणे, माळशिरस, धाराशिव आणि लातूर येथे सभा घेतल्या. अशा एकूण आतापर्यंत अकरा सभा त्यांनी घेतल्या आहेत. याशिवाय मोदी सहा मे रोजी बीडमध्ये येणार आहेत आणि दहा मे रोजी ते कल्याण आणि दिंडोरी येथे सभा घेण्याची शक्यता आहे.
म्हणून मोदी यांचे दौरे : या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते अरुण सावंत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात येण्यामागचं मुख्य कारण म्हणजे देशात खासदारांची जास्त संख्या असलेलं महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे. उत्तर प्रदेश हे पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे. तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असल्यानं या राज्यातून अधिकाधिक खासदार संसदेत यावेत, यासाठी मोदी यांनी प्रयत्न केला तर त्यात काही वावगं नाही. मोदी यांनी देशाचा विकास गेल्या दहा वर्षात केला आहे. त्यामुळं त्यांना मतदारांसमोर जाण्याचा हक्क आहे आणि महाराष्ट्रातील मतदार हे नेहमीच मोदींचे स्वागत करतात. त्यामुळं त्यांनी महाराष्ट्रात येऊन प्रचार दौरे करावेत अशी जनतेचीच अपेक्षा असते.