ठाणे Kedar Dighe VS Shrikant Shinde: राज्यातील सत्ता संघर्षानंतर ज्या मोजक्या जागा प्रतिष्ठेच्या मानल्या जातात, त्यात श्रीकांत शिंदे खासदार असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. मुख्यमंत्रीपुत्र खासदार असल्यामुळे या मतदारसंघाला वेगळं वलय आहे. दिवंगत आनंद दिघे (Anand Dighe) यांच्यानंतर ठाणे जिल्ह्यात त्यांचे शिष्योत्तम विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकहाती वर्चस्व ठेवलं आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातून 2014 आणि 2019 या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे खासदार म्हणून निवडून आले. पण ठाणे आणि कल्याणची 'शिवसेनेचे बालेकिल्ले' अशी ओळख अधिक ठळक करणारे एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) उद्धव ठाकरेंपासून वेगळे झाले आणि या मतदारसंघांमधली समीकरणं बदलली. त्यामुळं आता बालेकिल्ल्यांत पहिल्यांदाच 'शिवसेना विरुद्ध शिवसेना' असा सामना रंगणार आहे.
कल्याणचा सुभेदार कोण? : गेल्या काही महिन्यांमधला घटनाक्रम पाहिल्यास लहान भासणाऱ्या बाबीही ठाणे आणि कल्याण या दोन्ही मतदारसंघांमधली गणितं बदलू शकतात. या मतदारसंघांमध्ये शिंदे यांचा वरचश्मा आहे. त्यामुळे साहजिकच या बालेकिल्ल्यांना सुरुंग लावण्यासाठी विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात तुल्यबळ उमेदवार देणं उद्धव ठाकरे यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. दिवंगत आनंद दिघे यांच्या मृत्यूला बराच काळ लोटूनही स्मृती ठाणे आणि कल्याणकरांच्या ह्रयात ताज्या आहेत. त्यामुळे दिवंगत दिघे यांच्याशी थेट संबंधित असलेल्या व्यक्तीला लोकसभेचं तिकीट देण्याची राजकीय हुशारी उद्धव ठाकरे यांना दाखवून द्यावी लागेल. कल्याण मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांना मात देण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यासमोर दिघे यांच्या पुतण्याच्या, केदार दिघे यांच्या उमेदवारीचा भक्कम पर्याय उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. केदार दिघे यांना शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षाकडून लोकसभेची उमेदवारी मिळाल्यास शिंदे विरुद्ध दिघे असा चुरशीचा सामना रंगू शकतो. यात विजयश्री कुणाला मिळणार? पर्यायाने कल्याणचा सुभेदार कोण होणार? या प्रश्नांची उत्तरं मतदारांना इव्हीएम मशिनमधून द्यायची आहेत.
2014 लोकसभा निवडणुकीत मोदी लाट :2009 साली ठाण्यापासून वेगळा होत कल्याण हा नवीन लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आला. त्यावेळी येथून आनंद परांजपे हे निवडून आले होते. तर पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारानेसुद्धा या मतदारसंघात एक लाखांहू अधिक मतं मिळवली होती. तर 2014 लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत एकनाथ शिंदेंनी मुलगा श्रीकांत शिंदेंना मैदानात उतरवलं होतं. तर तत्कालीन खासदार आनंद परांजपे हे शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. अपेक्षेप्रमाणे, 2014 ची लोकसभा निवडणूक एकतर्फी झाली. पण पुन्हा एकदा मनसेने एक लाखांच्यावर मतं मिळवली आणि ती 2009 च्या प्रमाणात जास्त होती. 2019 मध्ये पुन्हा श्रीकांत शिंदे मैदानात होते. विरोधात राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील हे उमेदवार होते. या निवडणुकीत विजय मिळवण्याची फक्त औपचारिकता श्रीकांत शिंदे यांना पूर्ण करायची होती आणि ती त्यांनी केली.
ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी सत्ता संघर्षानंतर उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाचा 3 ते 4 वेळा दौरा करत राजकीय वातावरण तापवलं. आता त्यानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातून माजी आमदार सुभाष भोईर यांचे नाव सुरुवातीला चर्चेत होते. त्या पाठोपाठ आदित्य ठाकरे यांचं देखील नाव चर्चेत आहे. त्यानंतर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सुषमा अंधारे यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याची आवई उठली. कल्याणविषयी चर्चांचं चर्वितचर्वण सुरु असताना दिवंगत आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांना कल्याणची सुभेदारी मिळवण्याचा मोका उद्धव ठाकरे देतील, अशी दाट शक्यता आहे. याविषयी खुद्द केदार दिघे मात्र अतिशय सावध भूमिका देत आहेत. आपल्या नावाची चर्चा असली तरी साहेबांनी (उद्धव ठाकरे यांनी) आपल्याला अद्याप आदेश दिला नसल्याची प्रतिक्रिया देऊन ते मोकळे झाले आहेत. असं असलं तरी संभाव्य उमेदवारीची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी कल्याण मतदारसंघात शक्य त्या त्या मार्गांनी मतदारांशी संपर्कात रहायला सुरुवात केली आहे.