मुंबई JP Nadda Meets CM Eknath Shinde : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आले आहेत. बुधवारी रात्री त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. याप्रसंगी नड्डा यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपाचे राष्ट्रीय संघटक महामंत्री शिवप्रकाश, भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर उपस्थित होते.
जे पी नड्डा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तासभर चर्चा : दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आलेले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी बुधवारी रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं ही भेट महत्त्वाची मानली जातेय. लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीतील जागा वाटपाचा तिढा या भेटीत सोडला गेल्याचीही चर्चा आहे. राज्यात 45 आणि मुंबईतील सहाच्या सहा जागा जिंकण्याचा निर्धार भाजपा महायुतीनं केला आहे. त्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. विशेष म्हणजे अशा परिस्थितीत राज ठाकरे यांच्या मनसेला सोबत घेतल्यास त्याचा काय परिणाम होऊ शकतो, या विषयावरही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्याचबरोबर अपवादात्मक परिस्थितीत महायुतीच्या उमेदवारानं कमळ या चिन्हावर निवडणूक लढवावी, असा आग्रह जे पी नड्डा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केल्याचीही चर्चा आहे.