ठाणे :महाराष्ट्रात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान झालं. तर दुसरीकडं नांदगाव विधानसभेत तणावाचं वातावरण पाहायला मिळालं आहे. समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. तसंच कांदे हे भुजबळांच्या अंगावर धावून गेले. त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचं प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आलंय.
आम्ही काय हेल्मेट घालून फिरायचं का?: "सुहास कांदे यांनी हत्येची धमकी दिल्याच्या प्रकरणावर सत्ताधारी शिवसेनेचा उमेदवार खून करण्याची धमकी देतोय, मग आम्ही आता जॅकेट आणि हेल्मेट घालून फिरायचं का?" असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.
प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड (ETV Bharat Reporter)
लोकशाही मजबूत करण्यासाठी शस्त्राचा वापर करा :"मतदानाचा हक्क हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं शस्त्र आहे. या शस्त्राचा वापर लोकशाही मजबूत करण्यासाठी करावा असं आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केलंय. सत्ताधारी मोकाट पैसे वाटत फिरत आहेत. पोलिसांना सोबत घेऊन हे घडतय, अशी महाराष्ट्रात परिस्थिती आहे. कळवा मुंब्रा भागात पहाटेपर्यंत पैसे वाटप सुरू होतं. मी थांबवायला गेलो नाही पण हे असं वातावरण घातक असून असे प्रकार थांबवले पाहिजेत असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं".
कळवा मुंब्रामध्ये लागल्या रांगा : सकाळपासून कळवा आणि मुंब्रा भागात मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. मुंब्रा भागात मुस्लिम समाज देखील मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडल्याचं चित्र आहे. आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा फोटो मॉर्फ करून व्हायरल केल्याचा गुन्हा मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.
अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क : राज्यात सर्वच ठिकाणी शांततेत मतदान सुरू आहे. आज राजकारण्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी सहकुटुंब मतदान केलं. तर सलीम खान, हेमा मालिनी, श्रद्धा कपूर, राकेश रोशनसह या सेलेब्रिटींनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींसोबत संवाद साधला.
हेही वाचा -
- विधानसभा निवडणूक 2024 : दुपारी 3 वाजतापर्यंत 'इतके' टक्के मतदान, 'या' जिल्ह्यात सर्वाधिक मतदान
- अजित पवार, सुनेत्रा पवार यांनी केलं मतदान; सुप्रिया सुळेंच्या बिटकॉईन प्रकरणावर म्हणाले . . .
- सरकार महायुतीचंच येणार अन् मुख्यमंत्री भाजपाचा; नवनीत राणांना विश्वास