नवी दिल्ली INDIA Alliance UP : पश्चिम बंगाल आणि पंजाबमधील मित्रपक्षांकडून धक्का बसल्यानंतर, काँग्रेससाठी उत्तर प्रदेशातून दिलासादायक बातमी समोर आली आहे. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी काँग्रेसला लोकसभेच्या 11 जागांची ऑफर दिली. मात्र या ऑफरवर काँग्रेस संतुष्ट नसल्याची माहिती आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा आहेत.
काँग्रेस प्रदेश नेतृत्व नाराज : अलीकडेच, उत्तर प्रदेशात सपा आणि आरएलडीची युती झाली. या युती अंतर्गत आरएलडीला 7 जागा देण्यात आल्या. अखिलेश यादव यांनी 'X' वर पोस्ट करत काँग्रेसला 11 जागांची ऑफर दिली. मात्र सूत्रांनुसार, काँग्रेस उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 23 जागांवर निवडणूक लढण्यास उत्सुक आहे. अखिलेश यादव यांच्या 11 जागा देण्याच्या प्रस्तावावर काँग्रेस प्रदेश नेतृत्वानं नाराजी व्यक्त केली. अखिलेश यादव यांचा हा एकतर्फी निर्णय असून तो आम्हाला मान्य नाही, असं राज्यातील काँग्रेस नेतृत्वानं म्हटलंय. अखिलेश यादव यांच्या पोस्टवर जेष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीही प्रतिक्रिया दिली. "या संदर्भात अजूनही चर्चा सुरू असून, चित्र स्पष्ट झाल्यावर आम्ही घोषणा करू", असं ते म्हणाले.