पुणे Anand Dave On Praful Patel : वाराणसीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप देऊन पंतप्रधानांचं स्वागत केल्यानं महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया उमत आहेत. प्रफुल्ल पटेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची ही कृती महाराजांचा अवमान करणारी आहे असा हल्लाबोल, हिंदू महासंघाचे प्रमुख आनंद दवे यांनी केलाय. प्रफुल्ल पटेल यांच्याकडं ही लाचारी कुठून आली असा प्रश्नही आनंद दवेंनी उपस्थित केलाय. उद्या पंतप्रधान जर रायगडावर गेले तर त्यांना तिथल्या सिंहासनावर सुद्धा बसवणार का? असा संतप्त सवाल आनंद दवे यांनी उपस्थित केलाय. यापूर्वी सुद्धा भाजपाच्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात एका कार्यकर्त्यानं फक्त छायाचित्र काढल्यानं त्याच्यावर कारवाई केली होती. आता पंतप्रधानांवर भाजपा काही कारवाई करणार का? असा प्रश्न आनंद दवे (Anand Dave) यांनी केलाय.
महाराजांचा अपमान करण्याचा अधिकार कोणी दिला : वाराणसी येथील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करताना छत्रपती शिवाजी महाराज परिधान करत होते तसा जिरेटोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल पटेल यांनी त्यांना घातला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या भाजपाला महाराजांचा अपमान करण्याचा अधिकार कोणी दिला. त्यामुळं हिंदू महासंघानं संताप व्यक्त केलाय. या संदर्भात आम्ही कायदेशीर तज्ञांची मदत घेऊन गुन्हा दाखल करणार असल्याचं आनंद दवे यांनी सांगितलं.