कोल्हापूर : विधानसभा निवडणुकांच बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता असून याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आणि इच्छुक उमेदवार जोरदार तयारीला लागलेत. विशेषतः कागल विधानसभा मतदारसंघात निवडणुका जाहीर होण्याआधीच राजकारणाला ऊत आलेलं दिसतंय. शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्यासोबत गेलेले हसन मुश्रीफ हे त्यांचे कट्टर विरोधक असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते समरजितसिंह घाटगे यांच्यावर खालच्या पातळीचे शब्द वापरत टीका करताना दिसत आहेत. यामुळं मतदारसंघात मुश्रीफ आणि घाटगेंमधील संघर्ष आणखी तीव्र होत असून राजकीय वातावरण तापलेलं आहे. असं असतानाच आता पुन्हा एकदा घाटगे यांच्याविषयी बोलताना मुश्रीफांची जीभ घसरली. त्यामुळं आता नव्या वादाला तोंड फुटलंय.
काय म्हणाले हसन मुश्रीफ? : गडहिंग्लज येथे आयोजित सभेत बोलत असताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, "हा राजा आहे म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी बरीच कामं केली. घाटगे प्रत्येक आठवड्यात 30 ते 35 कामांची यादी घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्याकडं जात असत. यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची प्रक्रिया होती. दलाली करण्याचं काम यांनी केलं. हा राजा आहे की भिकारी?", असा खोचक सवाल त्यांनी केला. तसंच आम्ही शरद पवारांना गुरुदक्षिणा देऊन बाहेर पडलो. 35 वर्षांपूर्वी मी शरद पवार यांचं नेतृत्त्व स्वीकारलंय. शरद पवार आमचे दैवत होते, आहेत आणि नेहमी राहणार. आम्ही शरद पवारांना सांगून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांनीही त्यासाठी संमती दिली. जनतेनं दोन्ही प्रवृत्त्या तपासून डोळे उघडून मतदान करावं. विरोधकांचे विचार आणि प्रवृत्ती लोकांसमोर ठेवणं आवश्यक असल्याचंही मुश्रीफ म्हणाले.