नागपूर : समाजातील अनिष्ट रूढी परंपरा संपवण्यासाठी थोर पुरुषांनी आपलं संपूर्ण जीवन खर्ची घातलं आहे. तर काही शिक्षण महर्षींनी सर्व धर्मासाठी समाजासाठी शिक्षणाची द्वारं उघडी केली आहे. तरीही आपल्या देशात असे अनेक घटक आहेत जे अजूनही मूलभूत शिक्षणापासून वंचित आहे. अश्या वंचित, दुर्लक्षित आणि उपेक्षित घटकांच्या मुलांना शिक्षण मिळावं, यासाठी नागपूरचा एक तरुण गेल्या 19 वर्षांपासून सातत्यानं झटतोय. वंचित समाजाची मुलं शाळेपर्यंत जात नाहीत, म्हणून या तरुणानं चक्क शाळाचं त्यांच्यापर्यंत नेली आहे. खुशाल ढाक असं या समाजसेवक तरुणाचं नाव आहे. या मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी त्यांनी 3 वर्षांपूर्वी नागपुरातील रहाटे नगर टोली वस्तीत केवळ 1 रुपयांत कॉन्व्हेंट सुरू केलं आहे. या कॉन्व्हेंटमध्ये केवळ एक रुपयात प्रवेश घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तकं, गणवेश, बूटपासून सर्व सोयी निशुल्क उपलब्ध करून दिली जातात. 1 रूपयात कसा चालतो, या शाळेचा गाडा हे आजच्या या विशेष बातमीतून जाणून घेऊ या.
मी सरांकडं शिकल्यानंतर आता मुलांना शिकवायला सुरुवात केली. आता मुलांना घरी जाऊन घेऊन येते. काही पालकांना शिकवण्याची इच्छा नसते. काही मुलं शिकत असल्यानं इतर मुलांसह पालकांना शाळेची ओढ निर्माण होत आहे. मी आता बीए शिकत आहे. - अर्चना मानकर - शिक्षिका
तीन वर्षापूर्वी केली 1 रुपयात फी असलेली कॉन्व्हेंट सुरू : खुशाल ढाक यांनी 3 वर्षांपूर्वी केवळ 1 रुपया फी असलेली कॉन्व्हेंट सुरू केली. या मुलांसाठी आणि त्यांच्या उज्वल भविष्यासाठी 1 रुपयात कॉन्व्हेंट सुरू करण्याचा निश्चय त्यांनी केला. पण त्यासाठी लागणारी जागा आणि भांडवल, कसं आणि कुठून येईल, या एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर त्यावेळी त्यांच्याकडं नव्हतं. म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग. खुशाल यांनी रहाटे टोली वस्तीमध्ये 3 हजार रुपये महिना या प्रमाणं एक टीनाचं शेड भाड्यानं घेतलं. काही समाजसेवकांच्या मदतीनं या मुलांचे गणवेश आणि वह्या, पुस्तकं आली. पण खरा प्रश्न होता तो म्हणजे या सर्व मुलांना शाळेपर्यंत आणायचं कसं ?.
मुलं शिकत आहेत. ते घडतील याचा अभिमान वाटत आहे. ग्राऊंड लेवलला काम करायला आवडते. यांना शिकवत असताना मला नवीन शिकायला मिळते. मुलांना प्रार्थना आणि इतर गोष्टी शिकवणं आव्हानात्मक आहे. घरातील लोकांचं पूर्ण सहकार्य आहे. : भवरी गायकवाड - शिक्षिका
पगारातील 70 टक्के रक्कम मुलांवर खर्च : खुशाल ढाक यांनी यासाठी रहाटे टोली वस्तीत राहणाऱ्या अर्चनाची मदत घेतली. अर्चनानं या मुलांना गोळा करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. अनेकांना तर त्यांच्या घरातून पकडून आणावं लगे. अक्षरशः या मुलांना शाळेचा गणवेश स्वतः घालून द्यावा लागला. तीन वर्षांपूर्वी सुरू झालेले प्रयत्न आज फळास येताना दिसू लागले आहेत. मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होऊ लागली आहे. मुलं मराठी सोबत इंग्रजी देखील आवडीनं बोलू आणि वाचू लागली आहेत. 1 रुपयात कॉन्व्हेंटचं शिक्षण देण्यासाठी खुशाल ढाक हे स्वतः दिवसभर इतरत्र काम करतात आणि जी मिळकत होते, त्यातील 70 टक्के पगार ते या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करतात.
19 वर्षांपासून इथं मी काम करत आहे. आम्हाला सुरुवातीला थोडासा विरोध झाला. इथं शिक्षक येण्यासाठी तयार नव्हते. अर्चना मानकर ही या समुदायामधून स्वातंत्र्यानंतर पदवीधर झालेली पहिली विद्यार्थिनी आहे. इथून शिकलेल्या विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचं शिक्षण मिळत आहे. मुले आई-वडिलांसमवेत कचरा वेचायला जायचे. या मुलांचं आयुष्य कचरा वेचण्यात जाईल का, असा प्रश्न पडल्यानंतर शाळा सुरू केली. कॉन्व्हेंटमधून हळूहळू मुलांनी शिकण्यास सुरुवात केली. काहीतरी महत्त्वं असावं म्हणून 1 रुपया फी ठेवली आहे. - खुशाल ढाक - शाळा सुरू करणारे शिक्षक
अनेक मुली होणार उच्च शिक्षित : गरीब आणि कचरा वेचणाऱ्या लहान मुलांसाठी काहीतरी करावं, अशी ईच्छा खुशाल ढाक यांची होती. गेल्या 19 वर्षांपासून ते वंचित, दुर्लक्षित आणि उपेक्षित घटकातील या मुलांना शिक्षणाची गोडी निर्माण करण्याचं सातत्यानं काम करत आहेत. म्हणून आज या समाजातील अनेक मुली उच्च शिक्षित होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचल्या आहेत.
शिक्षणाचं महत्व पटवून देण्यात यश : असं म्हणतात की शिक्षण वाघिणीचं दूध आहे, शिक्षणात असलेली ताकद ज्यांनी ओळखली ते भविष्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे विद्वान झाले. म्हणूनचं आपल्या देशात शिक्षणावर सर्वांचा समान अधिकार आहे. मात्र, आपल्या देशामध्ये असे अनेक समाज व घटक आहेत, जे आजही या मूलभूत अधिकारापासून वंचित आहेत. जन्मजात गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या या घटकाला आणि समाजाला शिक्षणाचा गंध देखील नाही. या घटकातील मुलांना शिक्षण म्हणजे काय हेच माहीत नसल्यानं आपसूकचं या समाजातील लहान मुले बालवयात गुन्हेगारी जगताकडं वळू लागतात. हे मुलं या प्रक्रियेचा भाग होण्यापूर्वीच खुशाल ढाक अश्या मुलांना 1 रुपयात कॉन्व्हेंटमध्ये पुस्तकं हातात देऊन त्यांना शिक्षणाचं महत्व पटवून देतात. त्यामुळे भविष्यात जन्मजात गुन्हेगारीचा शिक्काचं पुसण्यात यश येणार यात शंका नाही.
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात भयाण वास्तव : समाजातील एक घटक, जो कायमचं दुर्लक्षित आणि उपेक्षित राहिलेला आहे. या दुर्लक्षित घटकाकडं इतर समाज गुन्हेगारांची जमात म्हणूनचं बघतो, कारण शासन दरबारी या समाजाला मोल नाही. हा समाज आणि त्यातील लोक त्यांच्या वोटबँकचा कधीही भाग नव्हते. त्यामुळे त्यांच्या वस्तीत वाईट कॉलर नेते देखील फिरकत नाहीत. मात्र, काही समाजसेवक आणि समाजसेवी संस्था सातत्यानं या भागात काम करत आहेत.
हेही वाचा :