मुंबई- सध्याच्या डिजिटल युगाच्या जमान्यात सर्व बाबी ऑनलाईन करण्याकडे अनेकांचा कल असतो. याचाच लाभ घेऊन ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने मोठी वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता त्यामध्ये डिजिटल अरेस्ट या नवीन प्रकाराची भर पडली आहे. एखाद्या अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सॲप किंवा व्हिडीओ कॉल करून समोरच्याला त्याच्याकडून न घडलेल्या गुन्ह्याची माहिती द्यायची आणि त्याच्यावर कारवाई म्हणून थेट डिजिटल अटक करायची, असे प्रकार वाढीस लागलेत. गेल्या काही दिवसांपासून या प्रकारात मोठी वाढ झालीय. या सगळ्यापासून बचावासाठी उपाययोजना काय आहेत त्यासंदर्भाज जाणून घेऊ यात.
पार्सलमध्ये अंमली पदार्थ मिळाले : तुमचं पार्सल आलंय, त्यामध्ये अंमली पदार्थ आहेत, तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केलेल्या कंपनीचा शेअर घोटाळ्यामध्ये सहभाग आहे, त्या कंपनीने आर्थिक गैरव्यवहार केलाय, त्यामुळे तुमच्यावर कारवाई केली जाणार आहे, त्यापासून बचावासाठी पैसे पाठवा किंवा तोपर्यंत काही काळ तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात येत आहे, असे सांगणारे कॉल येतात आणि त्यामध्ये नागरिकांना बेमालूमपणे मूर्ख बनवले जाते. त्यांची फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे उकळले जातात. लहान मुलांशी संबंधित अश्लील चित्रफीत पाहिल्याने त्याची नोंद आमच्या संगणकात झालीय, त्यामुळे तुमच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे, अशा प्रकारे नागरिकांना भामट्यांकडून फसवण्यात येतंय. या सर्वांपासून बचावासाठी तुमच्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. तुम्ही व्हिडीओ कॉल बंद करू नका, असे आदेश देण्यात येतात. काही प्रकरणात तर महिलांना अटक करताना त्यांची तपासणी करण्यासाठी कपडे उतरवण्यास भाग पाडले जाते आणि त्यानंतर त्याच व्हिडीओचा वापर करून ब्लॅकमेल केले जाते.
दोन मिनिटांत कर्ज : कोणतीही कागदपत्रे न देत अवघ्या दोन मिनिटांत, पाच मिनिटांत कर्ज देणाऱ्या विविध ॲप्सचा सध्या सुळसुळाट झालाय. ॲप इन्स्टॉल करताना त्यामध्ये मागितलेल्या सर्व बाबींना परवानगी दिली जाते. कर्ज दिले जाते, मात्र एकही हफ्ता थकला तर मात्र तुमच्या मोबाईलमध्ये असलेल्या सर्व क्रमांकावर तुमच्याबद्दल अतिशय घाण भाषेत माहिती पाठवली जाते. हे सर्व प्रकार टाळण्यासाठी अशा फसव्या जाहिराती करणाऱ्या ॲपपासून लांब राहण्याची गरज आहे. काही सोशल मीडियावर तर मैत्री करण्याचे आमिष दाखवून शारीरिक आणि आर्थिक पिळवणूक केल्याचे प्रकार घडतात, त्यामुळे या सर्व ॲपचा वापर करण्यापूर्वी काळजी घेणे आणि खबरदारी बाळगणे अतिशय आवश्यक आहे.
काय आहेत उपाययोजना? : सर्वप्रथम म्हणजे अशा प्रकारे कोणताही कॉल आला तरी घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. पोलीस, सीबीआय, ईडी अशा प्रकारे व्हिडीओ कॉल करून कारवाई करत नाहीत, याची जाणीव नेहमी ठेवावी. आपल्या घरातील, मित्र परिवारातील जवळच्या व्यक्तीला अशा कॉलबाबत माहिती द्यावी. एकाकी असलेल्या व्यक्तींना अशा प्रकारे जाळ्यात ओढण्यात भामटे जास्त यशस्वी होतात. सायबर फसवणूक झाल्यास तत्काळ 1930 या क्रमांकावर कॉल करून झालेल्या फसवणुकीबाबत माहिती द्यावी. 2022 मध्ये मुंबईत यासाठी केंद्र तयार करण्यात आले असून, 50 पोलीस कर्मचारी आणि 3 पोलीस अधिकारी या केंद्रासाठी 24 तास कार्यरत असतात. ऑनलाईन फसवणुकीमध्ये तत्काळ तक्रार करणे आवश्यक असते. या ठिकाणी कॉल केल्यावर तक्रारदाराकडून सर्व माहिती घेतली जाते. ऑनलाईन पद्धतीने गुन्हा नोंदवून 10 लाख रुपयांपर्यंतची फसवणूक असल्यास स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार वर्ग केली जाते आणि 10 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक असेल तर सायबर पोलीस ठाण्यामार्फत गुन्ह्याचा तपास केला जातो. 2024 मध्ये सुमारे 1200 कोटी रुपयांची फसवणूक झालीय, त्यापैकी 155 कोटी रुपये वाचवण्यात यश मिळालंय, तर 63 कोटी रुपये तक्रारदाराला परत करण्यात आलेत.
कोण आहेत लक्ष्य : डिजिटल अरेस्टच्या प्रकरणांमध्ये अनेकदा ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त कर्मचारी, महिला विशेषतः गृहिणी असा वर्ग लक्ष्य असल्याचे समोर आलंय. सुशिक्षित, नोकरदार, उच्चभ्रू, युवा पिढी यांचीदेखील या प्रकरणात फसवणूक झाल्याचे प्रकार उघडकीस आलेत. वर्क फ्रॉम होम, सेकंड इन्कमसाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती यांना जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक केली जाते.
चुकीची माहिती देऊन त्यांची फसवणूक करण्याचे प्रकार : गेल्या काही काळात सायबर गुन्ह्यांचे स्वरूप बदलत गेलंय. नागरिकांना चुकीची माहिती देऊन त्यांची फसवणूक करण्याचे प्रकार घडत आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी मुंबई पोलीस विविध पातळ्यांवर जनजागृती करीत आहे. एक्स, फेसबुक, इन्स्टाग्राम अशा विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आम्ही सातत्याने माहिती देऊन काळजी घेण्याचे आवाहन करतो. नागरिकांनी अशा प्रकारे आलेल्या कॉलवर सांगण्यात येणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवण्यापूर्वी आपली विवेकबुद्धी वापरावी. आपल्याला जे सांगितले जात आहे ते कितपत खरे असेल याचा विचार करून पुढील कृती करावी. मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या, महाविद्यालये यामध्ये आम्ही मार्गदर्शन करत आहोत. सामान्य नागरिकांनी अशा प्रकारे कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये आणि स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, ऑनलाईन व्यवहारामध्ये फसवणूक झाल्यास 1930 वर संपर्क साधावा. विविध ऑनलाईन खात्यांचे स्ट्राँग पासवर्ड ठेवावेत, खात्यांच्या सुरक्षिततेसाठी द्विस्तरीय ऑथेंटिकेशन पद्धत अवलंबावी, असंही सायबर शाखेचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितलंय.
हेही वाचा :