मुंबई - बॉलिवूडचा हँडसम अभिनेता हृतिक रोशननं 2000 मध्ये रिलीज झालेल्या 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. येत्या 14 जानेवारीला त्याच्या फिल्मी कारकिर्दीला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांतच 10 जानेवारीला त्याचा वाढदिवस येत आहे. त्यामुळं हृतिक आणि त्याच्या चाहत्यांसाठी हा महिना खरोखरच खास असणार आहे.
मंगळवारी हृतिकनं आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढत प्रसार माध्यमांशी बातचीत केली. या अनौपचरिक चर्चेमध्ये त्यानं आतापर्यंतच्या प्रवासात त्याला पाठिंबा दिल्याबद्दल माध्यमांचं आभार मानलं. "25 वर्षे! मला आठवतं की 25 वर्षांपूर्वी जेव्हा 'कहो ना... प्यार है' रिलीज होत होता तेव्हा मी इतका लाजाळू आणि चिंताग्रस्त होतो की मी एकही मुलाखत दिली नव्हती. मी काहीही करण्यासाठी घराबाहेर पडलो नाही. मी प्रमोशनसाठी तर बाहेरच पडलो नाही. आता याला 25 वर्षे उलटून गेली आहेत आणि दुर्दैवानं, मी अजूनही लाजाळू आहे... हे माझ्यासाठी एक निमित्त आणि संधी आहे की, तुम्हा सर्वांना अशा गोष्टी सांगाव्यात ज्या कदाचित मी 25 वर्षांत कधीच बोलल्या नसतील,” असं हृतिक म्हणाला.
"मला खरोखर वाटतं की तुम्ही मला तुम्ही सर्वांनी, गेल्या 25 वर्षात तुमच्याशी झालेल्या संवादातून एक चांगला माणूस आणि अभिनेता बनण्यास मदत केली आहे. तुमच्याशी झालेल्या प्रश्न उत्तरांनी मला अस्वस्थ केलंय. तुम्हीच मला जबाबदारीची जाणीव करुन दिली आहे, की हे लाजाळू व्यक्तीसाठी योग्य नाही", असं ह्रतिक पुढं म्हणाला.
प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी इतक्या आपुलकीनं हृतिक रोशन बोलल्यामुळे त्याच्या फिल्म इंडस्ट्रीतील 25 वर्षाच्या सेलेब्रिशन पार्टीला हजर असणाऱ्या मीडियाच्या सदस्यांचा मोठा आनंद झाला.
"मला माहिती आहे की, तुम्ही लोकांशी बोलता, त्यांना मी कसा आहे आणि मला कसे मसजून घेतलं याबद्दल सांगता. हे सर्व तुमचं मत तुमच्या शब्दांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवता आणि माझ्याकडे कसं पाहावं हेही शिकवता. याबद्दल मी तुमचा आभारी आहे. माझ्या इथवरच्या प्रवासात तुमचं मोठं योगदान आहे, त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो", असं तो शेवटी म्हणाला.
हृतिकचा पहिला 'कहो ना प्यार है' हा चित्रपट त्याचे वडील राकेश रोशन यांनी दिग्दर्शित केला होता. आता इतक्या वर्षांनंतर हा चित्रपट हृतिकच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.