मुंबई Expected Portfolio for Maharashtra : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि जम्बो मंत्रिमंडळ स्थापन केलं. 72 मंत्र्यांच्या या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा मंत्र्यांचा समावेश आहे. यात भारतीय जनता पक्षाचे चार, शिवसेनेचा एक तर रिपाईं (आठवले गट) एक मंत्री आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला यंदा कोणती खाती येणार याबाबत चर्चा सुरू असून महाराष्ट्राचं महत्त्व अबाधित ठेवण्याचा यातून प्रयत्न होईल, असं म्हटलं जातं.
राज्याच्या वाट्याला महत्त्वाची पदं : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा रविवारी शपथ घेतली. यावेळी त्यांनी स्थापन केलेल्या 72 जणांच्या मंत्रीमंडळात महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या चार मंत्र्यांचा समावेश आहे. तर नेहमीप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या रामदास आठवले यांचा समावेश आहे. तसंच शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांनाही संधी देण्यात आली आहे. या मंत्र्यांना दिली जाणारी खाती हा उत्सुकतेचा विषय असून या संदर्भात बोलताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी म्हणाले की, "महाराष्ट्रातील यंदा युतीच्या जागांची संख्या कमी झालीय. त्या तुलनेत महाराष्ट्राला दिलेली मंत्रिपदं ही महत्त्वाची आहेत. केवळ 9 खासदार जिंकूनसुद्धा भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात दोन कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रिपदं देण्यात आली आहेत. मात्र शिवसेना आणि रिपाईं पक्षाची नेहमीप्रमाणे राज्यमंत्रिपदावर बोळवण केली असून, यावेळी या दोन्ही पक्षांचा सन्मान होईल अशी शक्यता असताना पुन्हा एकदा भाजपानं या पक्षांना मंत्रिमंडळात दडपण्याचा प्रयत्न केला आहे."
महाराष्ट्रातील या मंत्र्यांचा समावेश :
नितीन गडकरी :नागपूरचे खासदार नितीन गडकरी हे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री म्हणून गेली दोन टर्म काम करत आहेत. त्यांनी सार्वजनिक बांधकाम आणि रस्ते वाहतूक या दोन खात्यांच्या माध्यमातून देशभरात मोठ्या प्रमाणात भौतिक सुविधा निर्माण केल्या आहेत. पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नितीन गडकरी यांना चौथ्या क्रमांकाचं मंत्रीपद देण्यात आलं असून त्यांना खातंही त्याच तोलामोलाचं देण्यात येईल. त्यांची इच्छा आणि कार्यशाही पाहता पुन्हा एकदा त्यांच्याकडं रस्ते वाहतूक विभागाचाच पदभार सोपवण्यात येईल अशी शक्यता जोशी यांनी व्यक्त केलीय.
पियुष गोयल :उत्तर मुंबई या लोकसभा मतदारसंघातून निवडून गेलेले खासदार पियुष गोयल यांना पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रिपदाची संधी देण्यात आलीय. पियुष गोयल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निष्ठावान सहकाऱ्यांपैकी एक मानले जातात. यापूर्वी पियुष गोयल यांनी रेल्वे मंत्रालय आणि वाणिज्य मंत्रालयाचा पदभार सांभाळलाय. यावेळी त्यांच्याकडे वाणिज्य मंत्री अथवा वस्त्रोद्योग मंत्रालय किंवा पेट्रोलियम मंत्रालयाचा पदभार दिला जाण्याची शक्यता आहे.