कोल्हापूर :विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिल्यामुळं राज्याच्या राजकारणात अनेक उलथापालथी पहायला मिळत आहेत. राज्याच्या राजकारणाचं केंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात संभाव्य उमेदवार जरी ठरले असले तरी, जिल्ह्यातील 10 पैकी 8 विधानसभा मतदारसंघात घराणेशाहीचा सिलसिला कायम राहणार आहे. जिल्ह्यातील अनेक नेते वारसदारांसाठी आग्रही असल्याचं दिसून येत असलं तरी, जनतेच्या दरबारात कोण 'वारस' ठरतो याकडं आता अवघ्या जिल्ह्याचं लक्ष लागलंय.
कोल्हापूरचे छत्रपती घराणं : विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे. मात्र, कोल्हापूरचं राजघराणं असलेल्या छत्रपती घराण्यातील कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात माजी आमदार मालोजीराजे छत्रपती आणि राज्याचे माजी आरोग्य मंत्री दिवंगत दिग्विजय खानविलकर यांच्या कन्या मधुरिमाराजे छत्रपती या दोन नावांची चर्चा सुरू आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरकरांनी छत्रपती शाहू यांना लोकसभेत पाठवलं. आता विधानसभेलाही राजघराण्यातील दोन सदस्यांची चर्चा सुरू आहे. तसंच स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार संभाजीराजे हे सुद्धा राज्याच्या राजकारणाचं मुख्य केंद्र बनले आहेत. यामुळं एकाच घरात राजकारणातील सर्व पदे नको असा एक मतप्रवाह सध्या कोल्हापुरात निर्माण झालाय. आता राजघराण्यातून कोल्हापूर उत्तरच्या मैदानात कोण उडी घेणार याबाबतही संभ्रमावस्था कायम आहे.
कोल्हापुरातील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील घराणं : कोल्हापुरातील डॉ. डी. वाय पाटील घराणं राज्याच्या राजकारणातील मातब्बर म्हणून ओळखलं जातं. डी. वाय पाटील हे काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून राज्यभर ओळखले जातात. 1957 साली कोल्हापूर नगरपरिषदेवर निवडून आल्यानंतर त्यांच्या राजकारणाचा श्री गणेशा झाला. यानंतर 1967 आणि 1972 यावर्षी तत्कालीन पन्हाळा-गगनबावडा विधानसभेवर आमदार म्हणून ते निवडून आले. पुढच्या काळात त्रिपुरा राज्याचे राज्यपाल म्हणूनही पाटील यांनी कार्यभार सांभाळला. पुढे काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील तत्कालीन करवीर आणि मतदारसंघ पुनर्रचनेनंतर कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. सध्या आमदार सतेज पाटील विधानपरिषद सदस्य आहे. पाटील घराण्याची तिसरी पिढी आमदार ऋतुराज पाटील कोल्हापूर दक्षिणचे प्रतिनिधित्व करत आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही दक्षिणमधून ऋतुराज पाटीलच विधानसभेच्या रिंगणात असणार आहेत.
जिल्ह्यात महाडिक घराण्याचीही निर्विवाद सत्ता: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपासून आपल्या राजकारणाची घडी घट्ट बसवणारे जिल्ह्यातील नेते म्हणून विधान परिषदेचे माजी आमदार महादेवराव महाडिक यांची जिल्ह्याला ओळख आहे. कोल्हापुरातील मातब्बर असलेल्या महाडिक घराण्याच्या राजकारणाची सुरुवात महादेवराव महाडिक यांच्यापासूनच झाली. कोल्हापूर महापालिकेवर एक हाती सत्ता राखून ठेवण्यात महाडिक यशस्वी झाले आणि यावरच त्यांनी जिल्ह्याचंं राजकारण केलं. कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर जिल्हा बँक, गोकुळ दूधसंघ, राजाराम सहकारी साखर कारखाना यासह जिल्ह्यातील अनेक सहकाराची सत्ताकेंद्र महाडिक यांच्याकडं राहिले. माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा राजकीय वारसा त्यांचे पुतणे आणि सध्याचे भाजपा राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी पुढे नेला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक लोकसभेवर निवडून गेले. तर याचवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महादेवराव महाडिक यांचे सुपुत्र अमल महाडिक यांनी कोल्हापूर दक्षिण मतदार संघातून विधानसभेत एन्ट्री केली. तर शौमिका महाडिक यांनी कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भूषविलं आहे. सध्या महाडिक यांची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय होत आहे. कोल्हापूर उत्तरच्या जागेवर खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र आणि प्रसिद्ध युट्यूबर कृष्णराज महाडिक यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झालीय.
कागलच्या मंडलिक आणि घाटगे घराण्याची जिल्ह्यावर सत्ता : कोल्हापूर जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ असलेल्या कागल विधानसभा मतदारसंघात गटातटाच्या राजकारणाला मोठं महत्त्व आहे. 1972 वर्षी अवघ्या 1624 मतांनी विजयी झालेले अपक्ष उमेदवार सदाशिवराव मंडलिक यांच्या राजकारणाचा खरा पाया कागलमध्ये घातला गेला. यानंतर त्यांनी कागल विधानसभेचं तब्बल चार वेळा प्रतिनिधित्व केलं. यानंतर 1999 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सदाशिवराव मंडलिक कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. सलग तीनवेळा कोल्हापूरचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलेल्या सदाशिवराव मंडलिक यांचे सुपुत्र संजय मंडलिक यांनी 2014 मध्ये प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश करत लोकसभा लढवली. मात्र त्यांचा पराभव झाला. यानंतर 2019 मध्ये संजय मंडलिक शिवसेनेकडून विजयी झाले. आता मंडलिकांची तिसरी पिढी वीरेंद्र मंडलिक यांच्या रूपाने कागलच्या राजकारणात सक्रिय होत आहे.
कागलच्या घाटगे घराण्याचा "वारसा": राजर्षी शाहू महाराजांच्या मूळ घराण्याचे वारसदार असलेले, कागलच्या शाहू कारखान्याचे चेअरमन विक्रमसिंह घाटगे यांनी 1978 च्या विधानसभा निवडणुकीत पारंपारिक प्रतिस्पर्धी सदाशिवराव मंडलिक यांचा 11 हजार 434 मतांनी पराभव करत विधानसभा गाठली होती. यानंतर 1980 वर्षी झालेल्या निवडणुकीतही मंडलिकांचा पराभव करण्यात घाटगे यशस्वी झाले होते. यानंतर मात्र 2004 च्या लोकसभा निवडणुकीत मंडलिक आणि घाडगे यांचा पराभव केला. विक्रमसिंह घाटगे यांचे सुपुत्र समरजीत घाटगे सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून कागलच्या आखाड्यात दुसऱ्यांदा उतरले आहेत. त्यांच्यासमोर राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांचं आव्हान असणार आहे.