मुंबई Lok Sabha Election 2024 : राज्यातील 90 टक्के पेक्षा अधिक महिलांना लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची इच्छा आहे. काही महिलांना नेमकी निवडणूक कशासाठी आहे, हे माहीत नसलं तरी मतदान करणार आहेत. मात्र, महिलांच्या विविध समस्यांची अद्यापही सोडवणूक झाली नसल्याची या महिलांची भावना आहे, अशी माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी दिलीय. स्त्री आधार केंद्राच्या वतीनं करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून ही निरीक्षणे समोर आल्याचं डॉ. गोऱ्हे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.
२०० महिला मतदारांचं सर्वेक्षण : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्त्री आधार केंद्र, पुणे आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं 'महिला मतदार राजकीय सक्षमीकरण आढावा' पहिला टप्प्याचं सर्व्हेक्षण करण्यात आलं. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतील २०० महिला मतदारांचं सर्वेक्षण एका प्रश्नावली फॉर्मच्या माध्यमातून करण्यात आलं. पत्रकारितेचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी एक अभ्यासाचा भाग म्हणून उत्स्फूर्तपणे सर्व्हेक्षण केलं. महिलांना भेडसावणाऱ्या समस्या, त्यावरील उपाययोजना आणि त्यांच्या उमेदवारांकडून असणाऱ्या अपेक्षा याचा अभ्यास केल्याचं, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं.
महिलांनी व्यक्त केल्या भावना: महिलांना वेगवेगळ्या समस्या जाणवत आहेत. त्यांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. निवडणूक नेमकी का घेतली जाते याबाबत विचारलं असता लोकप्रतिनिधी निवडणं आणि विकासकामे करण्यासाठी ही बाब महत्त्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं. लोकशाही जिवंत राहण्यासाठी निवडणूका होणं आवश्यक असल्याचं या महिलांनी सांगितलं. सार्वजनिक ठिकाणी पुरेशी स्वच्छतागृह नाहीत, पुरुषांच्या तुलनेत महिलांना पगार कमी आहे, हुंडा घेतला जात आहे, लैंगिक अत्याचारात आरोपींना तात्काळ शिक्षा व्हावी, महिलांना राजकारणात स्वतंत्र काम करण्यास वाव मिळावा, महागाई आणि सिलेंडर दर कमी व्हावेत, ईव्हीएमद्वारे पारदर्शक निवडणूक पार पडाव्यात, महिलांना स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार हवा, असं मत महिलांनी सर्वेक्षणात मांडल्याचं गोऱ्हे यांनी सांगितलं.