महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

बारामतीत पवारांचे 2 पाडवा मेळावे; शरद पवार म्हणाले, "जुनी पद्धत कायम राहिली असती, तर आनंद झाला असता" - SHARAD PAWAR NCP DIWALI PADWA

शरद पवार यांनी बारामतीमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. अजित पवार भेटायला का आले नाहीत? यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

SHARAD PAWAR NCP DIWALI PADWA
शरद पवार, अजित पवार (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 2, 2024, 4:30 PM IST

पुणे :बारामतीत आजपर्यंत पवार कुटुंबाचा एकच पाडवा होत होता, मात्र पक्षफुटीनंतर या दिवाळीत दोन पाडवा होताना पाहायला मिळालं. एक शरद पवार यांचा तर दुसरा अजित पवार यांचा पाडवा पाहायला मिळाला. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय. "अनेक वर्षाची परंपरा आहे की, याठिकाणी पाडवा साजरा केला जातो. याच प्रांगणात आम्ही सगळे जमत असतो. ही जुनी पद्धत आहे. ही पद्धत कायम राहिली असती तर मला आनंद झाला असता. लोकांना दोन ठिकाणी जावं लागलं आणि थोडा त्रास झाला यामुळं मी अस्वस्थ आहे," असं शरद पवारांनी म्हणाले.

राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी लढत होताना पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी फुटीनंतर बारामती विधानसभा मतदारसंघात काका विरुद्ध पुतणे अशी लढत होत असून अजित पवार की युगेंद्र पवार अशी जोरदार चर्चा सध्या राज्यात पाहायला मिळत आहे. अश्यातच आज दिवाळी पाडवानिमित्त बारामतीत पहिल्यांदा पवार कुटुंबीयांकडून दोन पाडवा कार्यक्रम झाले. दोन्ही पाडवा कार्यक्रमाला बारामतीकर तसंच राज्यातील वेगवेगळ्या भागातील नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होती. या पाडवा कार्यक्रमाच्या नंतर शरद पवारांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी पाडव्याबाबत वक्तव्य केलं.

पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार (Source - ETV Bharat Reporter)

अजित पवारांना वेळ मिळाला नसेल : "आमच्या कुटुंबातील सर्व लोक पाडव्याच्या आदल्या दिवशी येतात. अजित पवारांना काही कामामुळं वेळ मिळाला नसेल. पण इतर सर्व होते. त्यांच्या दोन बहिणी इथेच होत्या. बाकी सगळे जण होते. काही वेळा कामामुळे माझ्याकडूनही उशीर व्हायचा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लोक आज मला येऊन भेटले. यावेळी नेहमी पेक्षा अधिक लोक आले," असं शरद पवारांनी म्हटलंय.

राज्यातील जनतेला चांगले दिवस यावे :पाडव्याच्या निमित्तानं जनतेला काय संदेश देणार असं पवार यांना विचारलं असता ते म्हणाले, "आजचा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा दिवस असून एकमेकांना शुभेच्छा देणं, तसंच पुढील वर्ष सुख समृध्दीचं जावं ही सदिच्छा देत असतो. त्याच दृष्टीनं पाडव्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्यातील जनतेला चांगले दिवस यावे, त्यांच्या जीवनात स्थिरता यावी आणि त्यांचे प्रश्न सुटावे ही अपेक्षा आहे. मला स्वतःला राज्यातील सद्यस्थितीची चिंता वाटते. काही महत्त्वाचे प्रश्न हाताळण्यात सत्ताधारी पक्षांना अपयश आलेलं आहे. राज्यात बदल पाहिजे आणि ज्याच्यात बदल करण्याची शक्ती आहे त्यांना लोकांनी साथ दिली पाहिजे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून हा बदल होऊ शकतो. पाडव्याच्या दिवशी हाच निर्धार करायचा आहे की, राज्यात परिवर्तन आणायचं आहे."

सत्ता हातात असल्यानं काहीही बोलायला मुक्त : सिंचन घोटाळ्याच्या अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर शरद पवारांना विचारलं असता ते म्हणाले, "सिंचन घोटाळ्याचा उल्लेख आम्ही कोणीही केलेला नाही. हा प्रश्न कुणी काढला याबाबत आम्ही सांगायची गरज नाही. पण आम्ही अस्वस्थ यासाठीच आहोत की, राज्याच्या राजकारणात अत्यंत स्वच्छ व्यक्तिमत्व आणि उत्तम प्रशासक म्हणून ज्यांचा लौकिक होता, अशा नेत्यांबाबत आज उलट-सुलट चर्चा सुरू आहे, हे अशोभनीय आहे. ती व्यक्ती जाऊन 9 वर्ष झाली आणि ज्यांचा लौकिक स्वच्छ आणि प्रामाणिक असा होता त्या व्यक्तीबद्दल असं बोलणं योग्य नाही. सत्ता हातात असल्यानं आपण काहीही बोलायला मुक्त आहोत, असा काही लोकांचा समज आहे, असं म्हणत शरद पवारांनी अजित पवार यांचं नाव न घेता टोला लगावला.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन घोटाळ्याची फाईल दाखवली असं सांगितलं जातं आहे. यावर शरद पवारांना विचारलं असता ते म्हणाले, "मी देखील प्रशासनात काही वर्ष काम केलं आहे. त्यांच्या इतकं मी काम केलं नसेल, पण शासनात मी पाहिलं आहे की, शासनाच्या यंत्रणेत प्रतिनिधी होण्यासाठी राजभवन येथे जी शपथ घेतो, त्यात अश्या गोष्टी कोणालाही दाखवणार नाही आणि त्याची गुप्तता राखेल, असं त्या शपथमध्ये लिहिलेलं असतं."

महिलांची फसवणूक : सरकारच्या लाडक्या बहीण योजनेचा महिलांना फायदा होईल असं वाटत का? असा सवाल शरद पवारांना विचारला असता ते म्हणाले, "काही महिलांना मी याबाबत विचारलं तेव्हा त्या महिलांनी मला सांगितलं की, आम्हाला पैसे मिळाले पण आमचं बजेट कोलमडलं आहे. अनेक गोष्टी महाग झाल्या असून आमची फसवणूक झाली आहे, असं महिला सांगत असल्याचं यावेळी पवार म्हणाले."

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अनेक उमेदवारांना एबी फॉर्म हेलिकॉप्टर मधून पाठवण्यात आले. याबाबत पवारांना विचारलं असता ते म्हणाले, "हेच तर या सरकारचं वैशिष्ट्य आहे. मला काही अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारांना जी आर्थिक रसद पोचवली जाते, ती सरकारच्या माध्यमातून पोलिसांच्या गाडीमधून पोहोचवली जात आहे. मी तर उघड यावर सांगणार होतो पण काही अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर मला माहिती दिली आहे."

रश्मी शुक्लांबाबत शरद पवारांची प्रतिक्रिया : शरद पवार यांनी यावेळी बोलताना रश्मी शुक्ला यांच्याबाबतही विधान केलं आहे. "माझी सुरवात ही पहिल्यांदा गृहखात्याचा राज्यमंत्री म्हणून झाली. त्यानंतर गृहमंत्री होतो. चारवेळा मुख्यमंत्री असताना गृहखातं माझ्याकडे होतं. मला गृहखात्याची चांगली माहिती आहे. चांगले कर्तबगार अधिकारी गृहखात्यात होते. राज्यात पहिल्यांदा अश्या पद्धतीने पोलीस महासंचालकाबाबत वक्तव्यं केली जातं आहेत. त्यांनी काय काय उद्योग केले, फोन टॅपिंग झाली त्याची चर्चा झाली. खरंतर चौकशी करून त्यातील सत्य काढण्याची सरकारची जबाबदारी होती. पण सरकारनं जबाबदारी पाळली नाही, असं शरद पवार म्हणाले.

हेही वाचा

  1. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या; काँग्रेसच्या चेन्नीथला यांचा गंभीर आरोप
  2. "विधानसभेनंतर ओबीसी आरक्षण थांबवलं जाणार", प्रकाश आंबेडकरांचा दावा
  3. अरविंद सावंतांच्या बोलण्यात व्यक्तिगत हल्ला दिसला नाही, शायना एनसी प्रकरणी शरद पवारांनी केली पाठराखण

ABOUT THE AUTHOR

...view details