उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका मुंबई Devendra Fadnavis Criticized Uddhav Thackeray : महाविकास आघाडीकडून मुंबई उत्तर मध्यमधून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आलीय. त्यामुळं शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच काँग्रेसला मतदान करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या चर्चांमागचं कारण म्हणजे, उद्धव ठाकरे हे उत्तर मध्य मुंबईत राहतात, आणि आता या मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीत काँग्रेसकडं गेली आहे. याच संदर्भानं बोलताना उद्धव ठाकरे यांनी एका पत्रकार परिषदेत वर्षा गायकवाड यांना म्हणजे काँग्रेसला मतदान करणार असल्याचा उल्लेख केला होता. यावरूनच आता त्यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जोरदार टोलेबाजी केली आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? :बुधवारी (1 मे) मुंबई भाजपाच्या वतीनं दादर येथील कामगार मैदानावर भव्य कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलत असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "स्वातंत्र्याच्या लढ्यात महाराष्ट्रानं दिलेलं योगदान कोणीच नाकारु शकत नाही. मात्र, महाराष्ट्र तयार होत असताना काँग्रेसकडून अनेक लोकांना हुतात्मा करण्यात आलं. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जाहीरपणे सांगितलं होतं की, ज्या दिवशी माझ्यावर काँग्रेससोबत जाण्याची वेळ येईल, त्यादिवशी माझं शिवसेना नावाचं दुकान मी बंद करेन. मात्र, आता बाळासाहेबांचेच चिरंजीव काँग्रेसला मतदान करणार आहेत. मी उद्धव ठाकरे यांची एक पत्रकार परिषद बघितली. त्यामध्ये ते हसत-हसत सांगत होते की, उत्तर मध्य मुंबईमधून काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड यांना मतदान करणार आहे. उद्धव ठाकरेंचे हे शब्द ऐकून बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला काय वाटलं असेल?”, असा खोचक सवाल फडणवीसांनी केला.
बाळासाहेबांच्या विचारांना जिवंत ठेवण्याचं काम शिंदेंनी केलं :पुढं ते म्हणाले की, "एकीकडं बाळासाहेब ठाकरेचं नाव घ्यायचं आणि त्यांच्या विचाराशी प्रतारणा करायची. मात्र, लक्षात ठेवा बाळासाहेब ठाकरेंच्या संपत्तीचे मालक जरी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे असतील, तरी त्यांच्या विचारांचे खरे मालक हे एकनाथ शिंदेच आहेत. कारण, बाळासाहेबांच्या विचारांना जिवंत ठेवण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलंय.” तसंच आता आपण महाराष्ट्राचा विकास पाहातोय. आज देशाच्या जीडीपीतील 15 टक्के जीडीपी हा महाराष्ट्रात तयार होतो. देशातील एकूण वस्तू उत्पादनामध्ये 20 टक्के हिस्सा महाराष्ट्राचा आहे. सर्वात जास्त परकीय गुंतवणूक आज महाराष्ट्रात येते. मात्र, असं असताना महाराष्ट्रातून उद्योग गुजरातला जात असल्याच्या चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात असल्याचा आरोपही फडणवीसांनी केला.
तोंडाच्या वाफा काढून राज्य पुढं जात नाही : "जर तुम्ही महाराष्ट्राबद्दल बोलताय तर तुमच्या मनगटात धमक नव्हती का?, ज्या महाराष्ट्राला आम्ही आमच्या कारकीर्दीत पहिल्या क्रमांकावर आणलं होतं, तो तुमच्या कारकीर्दीत मागे का गेला? फक्त तोंडाच्या वाफा काढून राज्य पुढं जात नाही. यासाठी मनगटात जोर असावा लागतो. तसंच आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे असून रडणारे नाही तर लढणारे आहोत", असंही फडणवीस यावेळी म्हणाले.
हेही वाचा -
- महाराष्ट्र दिन; महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन, देशाच्या प्रगतीत आहे मोठा वाटा : देवेंद्र फडणवीस - maharashtra day
- “मी नागपुरी, मला...”, देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना टोला - Devendra Fadnavis
- विरोधक जिंकतात त्यावेळी ईव्हीएम मशीन बरोबर, मग हरतात तेव्हा आक्षेप का? मुख्यमंत्र्यांचा प्रश्न तर राऊतांचा फडणवीसांवर भ्रष्टाचाराचा आरोप - CM Eknath Shinde