उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शरद पवार गटावर खोचक टीका पुणे Devendra Fadnavis On Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाला 'तुतारीवाला माणूस' हे चिन्ह मिळाल्यानंतर आज (24 फेब्रुवारी) त्याचं लोकार्पण शरद पवार यांच्या हस्ते रायगडावर करण्यात आलं. यावरुन आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? :यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना देवेंद्र फडवणीस म्हणाले की, "मला एवढंच माहिती आहे की चाळीस वर्षानंतर शरद पवार हे रायगडावर गेलेत. छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांना आठवण झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या सगळ्याचं क्रेडिट दिलंच पाहिजे." तसंच यापुढं तुतारी वाजेल की हवा निघेल, हे आता जनतेच्या समोर मतदानाला गेल्यानंतरच कळेल," असंही ते म्हणाले.
पुणे पोलिसांचं केलं कौतुक : देशातील सर्वात मोठं ड्रग्ज रॅकेट पुणे पोलिसांनी उघड केलं असून आतापर्यंत तब्बल 4000 कोटींचं ड्रग्ज पुण्यात जप्त करण्यात आलं आहे. तसंच याप्रकरणी दिल्लीत केलेल्या छापेमारीत आरोपींना पुणे पोलिसांनी पुण्यात आणलं आहे. यावर प्रतिक्रिया देत फडणवीस म्हणाले की, "पुणे पोलिसांनी ड्रग्जचं मोठं रॉकेट उघडकीस आणलंय. निश्चितपणे पुणे पोलिसांचं कौतुक केलं करायला हवं. यामध्ये अनेक लोकांचा सहभाग असून ते कोण हे आता लवकरच उघड होइल. यासंदर्भात देशपातळीवर करत असलेल्या संस्थांना आम्ही मदत करणार आहोत", असं फडणवीसांनी यावेळी सांगितलं.
विरोधकांच्या टीकेला दिलं उत्तर : राज्यात पुन्हा कंत्राटी भरती सुरू असल्याची टीका राजकीय विरोधक करत आहेत. याविषयी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "काही ठिकाणी ही कंत्राटी भरती सातत्यानं सुरूच असते. त्यात नवीन काही नाही. आपण पूर्ण कंत्राट भरतीचा जीआर रद्द केला आहे. त्यामुळं कंत्राट भरती पूर्णपणे नाही पण त्या ठिकाणी आवश्यक आहे तिथे ते होतच असते."
हेही वाचा -
- "तुताऱ्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा, पण महाराष्ट्रात", चंद्रकांत पाटलांची टोलेबोजी
- 'महाराष्ट्र आता नव्या क्रांतीसाठी तयार झाला'; 'तुतारी' चिन्ह मिळाल्यानंतर रोहित पाटलांचा हल्लाबोल
- डोलीतून रायगडावर पोहोचले शरद पवार; स्वतः 'तुतारी' वाजवत नव्या चिन्हाचं अनावरण