मुंबई - महायुतीचे जागावाटप एक ते दोन दिवसांत जाहीर होत असताना भाजपाकडून एक मोठी बातमी समोर येत आहे. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपाने मुंबईतील विद्यमान ३ खासदारांचे पत्ते कापले होते. अशात आता विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील भाजपाच्या विद्यमान ५ आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुमार कामगिरीचे कारण पुढे करत भाजपा नेतृत्वाकडून यंदा या ५ आमदारांना उमेदवारी दिली जाणार नाही, असे संकेत मिळत आहेत. महत्त्वाचं म्हणजे या आमदारांमध्ये भाजपाचे प्रवक्ते राम कदम यांच्याही नावाचा समावेश आहे.
पराभव भाजपाच्या चांगलाच जिव्हारी लागला : विधानसभा निवडणुकीची तारीख घोषित झाल्यानंतर राजकीय घडामोडींना मोठा वेग आलाय. अशातच या निवडणुकीच्या रणसंग्रामात अनेक विद्यमान आमदारांचे पत्ते कापले जाणार आहेत. राज्यातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाकडून मुंबईतील ५ विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं जाणार आहे. यामध्ये सर्वात मोठं नाव म्हणजे भाजपाचे घाटकोपर पश्चिमचे विद्यमान आमदार आणि प्रवक्ते राम कदम यांचं आहे. राम कदम हे भाजपाचे मुंबईतील मोठ्या नेत्यांपैकी एक आहेत. परंतु आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राम कदम यांच्या मतदारसंघांमध्ये भाजपाचे उमेदवार मिहीर कोटेच्या हे पिछाडीवर राहिले होते. मिहीर कोटेच्या यांचा पराभवदेखील झाला होता आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय दिना पाटील विजयी झाले होते. हा पराभव भाजपाच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. कारण या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड शोसुद्धा केला होता.
सतत ३ वेळचे आमदार : २००९ पासून राम कदम सतत तीनदा विधानसभा निवडणूक जिंकलेत. २००९ साली राज ठाकरे यांच्या मनसेमधून त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली होती आणि ते विधानसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर २०१४ मध्ये राम कदम यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. २०१४ आणि २०१९ असं सतत दोन वेळा ते भाजपाकडून निवडून आले. परंतु आता भाजपाने केलेला एकंदरीत सर्व्हे , राम कदम यांची घसरलेली लोकप्रियता, मागील पाच वर्षांतील त्यांची सुमार कामगिरी या कारणांमुळे भाजपा नेतृत्वाकडून राम कदम यांचा यंदा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे.
गोपाळ शेट्टींना दिला होता शब्द : राम कदम यांच्यासह वर्सोवा विधानसभेच्या विद्यमान आमदार भारती लव्हेकर, सायन मतदारसंघाचे आमदार कॅप्टन तमिल सेल्वन, घाटकोपर पूर्वचे आमदार पराग शाह, बोरिवलीचे आमदार सुनील राणे यांचाही समावेश आहे. सुनील राणे यांच्या जागी भाजपाकडून माजी खासदार गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून दोन वेळचे खासदार गोपाळ शेट्टी यांचा मागील लोकसभा निवडणुकीत पत्ता कट करून त्यांच्या जागी पीयूष गोयल यांना उमेदवारी दिली होती. त्या दरम्यानच नाराज गोपाळ शेट्टी यांची मनधरणी करत त्यांना विधानसभेसाठी उमेदवारी दिली जाणार, असा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला असल्याची चर्चा आहे. तर वर्सोव्याच्या आमदार भारती लव्हेकर यांच्या जागी भाजपाचे मुंबईतील उत्तर भारतीय नेते संजय पांडे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. सायनमध्ये आमदार कॅप्टन तमिल सेल्वन यांच्या जागी राजश्री शिरवाडकर यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. तर घाटकोपर पूर्वमध्ये पराग शहा यांच्या जागी माजी आमदार प्रकाश मेहता यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते. घाटकोपर पश्चिममध्ये राम कदम यांच्या जागी कुणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.
भाजपाकडून मुंबईतील 'या' ५ आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता
घाटकोपर पश्चिम - राम कदम
घाटकोपर पूर्व - पराग शाह
वर्सोवा - भारती लव्हेकर
सायन - कॅप्टन तमिल सेल्वन
बोरिवली - सुनील राणे
हेही वाचा :